काय घडलं?
महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मुरे आणि गणेश हनुमंत मोटे यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘महेश चंदनशिवे याच्यावर बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली होती. ३० नोव्हेंबर २०२२पासून चंदनशिवे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. याआधी दोन ते तीन वेळा चंदनशिवेने कारागृहात शिक्षा भोगली आहे.’
वर्ष २०२१मध्ये गणेश मोटे आणि महेश चंदनशिवे कारागृहात शिक्षा भोगत असताना दोघांचे वाद होऊन हाणामारी झाली होती. तेव्हापासून दोघांत युद्ध भडकले होते. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारागृहात आल्यावर चंदनशिवेला ‘सर्कल २’मधील ‘बराक क्रमांक १’मध्ये ठेवण्यात आले होते.
कैद्यांनी केली मारहाण
‘बराक क्रमांक १’च्या आवारात गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चंदनशिवे वावरत असताना अनिकेत, महेश, आदित्य आणि गणेश यांनी त्याच्यावर हल्ला करून मारहाण सुरू केली. त्या वेळी कैद्यांनी कारागृहात लपवून ठेवलेली कटिंग करण्याची कात्री चंदनशिवेच्या पोटात भोसकली आणि त्याच्या मानेवरही वार केले.
कैद्यांना विभक्त करून परिस्थितीवर नियंत्रण
कैद्यावर कात्रीने हल्ला झाल्याचे समजताच कर्तव्यावरील अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन चंदनशिवेची मारेकरी कैद्याच्या तावडीतून सुटका केली. अधिक कुमक आल्यावर कैद्यांना विभक्त करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान कात्रीच्या हल्ल्यात गंभीर जखमी कैद्यावर तातडीने कारागृहातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात हलवले; पण ‘ससून’मध्ये उपचारादरम्यान चंदनशिवेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मारेकरी कैद्यांवर आधीच खुनाचे गुन्हे दाखल
पूर्ववैमनस्यातून चंदनशिवेचा खून करणाऱ्या दोन कैद्यांवर खुनाचा आणि इतर दोन कैद्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पिंपरी आणि खेड न्यायालयाच्या आदेशाने चारही कैदी कारागृहात न्यायालयीन कैदी म्हणून शिक्षा भोगत आहेत, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.