मोपलवार यांना काही दिवसांपूर्वीच ‘एमएसआरडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमचा राजीनामा दिला. राज्यातील मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. या वॉर रूमच्या माध्यमातून प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत आहे. मोपलवार यांनी गुरुवारी अचानक सोपवलेला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असल्याचे कळते.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मोपलवार यांच्या राजीनाम्यानंतर गुरुवारी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेल्या एका ‘मित्रा’शी त्यांचे संबंध बिघडल्याने मोपलवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. तर, दुसरीकडे मोपलवार हे परभणी अथवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची चाचपणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मोपलवार यांची कारकीर्द
राधेश्याम मोपलवार यांची सप्टेंबर २०१५पासून ‘एमएसआरडीसी’वर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०१८मध्ये ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही त्यांना विक्रमी वेळा मुदतवाढ देण्यात आली. ‘एमएसआरडीसी’मध्ये असताना मोपलवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला गती दिली होती. या प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खुला झाला. ‘एमएसआरडीसी’मध्ये असतानाच मोपलवार यांची वर्णी वॉर रूमवर लागली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News