हायलाइट्स:
- अहमदनगर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस
- अनेक भागांत अतिवृष्टी
- गावांत, बाजारपेठेत शिरले पाणी
अहमदनगरः बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे.
काल सायंकाळपासून पावसाला सुरवात झाली आहे. रात्रभर पाऊस सुरूच होता. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरीचा काही भाग, नगर तालुका या भागात जास्त पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगर तालुक्यात ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, मुसळवाडी येथे ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथर्डी तालुक्यात कोरडगाव, कासारपिंपळगाव या भागाला जादा फटका बसला. नगर तालुक्यात जेऊर बायजाबाईचे गावात रात्री ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मुंबईत पावसाचा जोर वाढला; पुढील तीन तासांत मुसळधार पावासाचा इशारापिंपळगाव माळवी भागातही पाऊस झाला असून तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता. त्यामुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बंद झाली होती. पुराच्या पाण्यामुळे धनगरवाडी, चापेवाडी, ससेवाडी, तोडमलवाडी, शेटे वस्ती या ठिकाणाचा संपर्क तुटला. धनगरवाडी आणि परिसरातील कांदा, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळगाव माळवी तलावात पाण्याची आवक झाल्याने तलाव भरला आहे.
जेऊर भागात पाऊस झाल्याने नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून नदीपलिकडील उपनगराचा नगर शहराशी संपर्क तुटला आहे. नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. कल्याण रोडवरील सीनानदीवरील पुलावर एक बस पुराच्या पाण्यात अडकली. बसमधील चालकाला स्थानिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
कन्नड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांत नवीन पाणी येऊ लागले आहे. मुळा धरण येथे ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यासह भंडारदरा भागात तुलनेत कमी पाऊस आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्वभागात पावसामुळे आता नुकसान होऊ लागल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे.