सुहानीने तीन महिन्यापूर्वीच यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या वसतिगृहात ती राहत होती. सुहानी हुशार होती. ऑल इंडिया रँकमधून खुल्या प्रवर्गात तिला प्रवेश मिळाला होता. त्यामुळे तिला अभ्यासाचा तणाव नव्हता. सुट्ट्या असल्याने तिच्या रूम पार्टनर आपल्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे सुहानी खोलीत एकटीच होती. सुहानी मितभाषी होती. ती फारशी कोणात मिसळत नसे.
गुरुवारी रात्री बाराच्या दरम्यान तिच्या खोलीबाहेर जेवणाचा डबा तसाच होता. खोलीतील लाईट व पंखा सुरू होता. तेव्हा बाजूच्या खोलीतील विद्यार्थिनीने तिला आवाज दिला पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्या विद्यार्थिनीने वॉर्डनला कळविले. काही तरी अनुचित प्रकार घडला असल्याची शंका आल्याने वॉर्डने महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांना कळविले. माहिती मिळताच ते तत्काळ वसतिगृहात आले.
कर्मचाऱ्यांनी खिडकीतून आत पाहिले असता सुहानी पंख्याला लटकलेली दिसली. डॉ. जतकर यांनी पोलिसांना कळविले. शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता सुहानी मृत झाल्याचे आढळून आले. त्यानतंर पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला. डॉ. जतकर यांनी सुहानीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी तिचे वडील व मामा यवतमाळला पोहचले. दुपारी मृतदेह घेऊन धाराशिवला रवाना झाले. तिला आत्महत्येमुळे आईवडिलांना व वसतिगृहातील विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News