ग्रामीण भागातून सर्वाधिक अर्ज
शिक्षण, नोकरी, व्यवसायाबरोबरच पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या दहा वर्षांत कैक पटीने वाढली आहे. प्रगत शहरांबरोबरच छोटी शहरे, उपनगरे आणि ग्रामीण भागातून पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. त्यामुळे दर वर्षी पासपोर्ट वितरणाचे आकडे उच्चांक गाठत आहेत. ‘गेल्या वर्षी (२०२२) पुणे पासपोर्ट विभागाने तीन लाख ४४ हजार ४४७ पासपोर्टचे वितरण केले. यंदा पहिल्या नऊ महिन्यांतच आम्ही वितरणाचा विक्रम मोडला आणि डिसेंबर २०२३अखेरपर्यंत साडेचार लाख पासपोर्टचे वितरण केले,’ अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी दिली.
‘अपॉइंटमेंट १० दिवसांतच’
‘नागरिकांना अपॉइंटमेंटसाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे लक्षात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला गरजेनुसार पासपोर्ट मेळावे, शनिवारी सुटीच्या दिवशी काम करून अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पुणे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शनिवारी दिवसभर काम करून पासपोर्टचे अधिकाधिक अर्ज स्वीकारले. पुणे विभागातील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रही आम्ही शनिवारी सुरू ठेवले. त्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा संपुष्टात आली. सध्या नियमित पासपोर्टची अपॉइमेंट दहा ते पंधरा दिवसांत मिळत आहे,’ असेही देवरे म्हणाले.
वर्षनिहाय पासपोर्टचे वितरण
वर्ष पासपोर्टची संख्या
२०१४ दोन लाख १० हजार ४२२
२०१५ दोन लाख ८० हजार ७९५
२०१६ दोन लाख ६७ हजार ५३९
२०१७ तीन लाख ३३ हजार ७७२
२०१८ चार लाख ३१७
२०१९ चार लाख ९८६
२०२० एक लाख ६१ हजार २९५
२०२१ दोन लाख ३१ हजार ३४६
२०२२ तीन लाख ४४ हजार ४४७
२०२३* चार लाख ५५ हजार २१०
(*२८ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी)
पुण्यात येण्याची गरजच नाही
पुणे पासपोर्ट विभागात मुंढवा आणि सोलापूर येथे पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत आहेत. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूरसह १४ जिल्ह्यांत १७ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा (पीओपीएसके) केंद्रे आहेत. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी या जिल्ह्यांतील नागरिकांना पुणे गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, हल्ली ते जवळच्या ‘पीओपीएसके’मध्ये अपॉइंटमेंट घेऊन अर्ज दाखल करतात. पुणे पोलिस विभागाकडून पडताळणीसाठी अद्यायवत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. अनेकांना अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसांत पासपोर्ट हातात मिळत आहे.
‘गरज असेल, तरच तत्काळचा पर्याय’
‘अपॉइंटमेट मिळण्यापासून ते पडताळणीपर्यंतची प्रक्रिया सोपी झाल्याने अल्पावधीत पासपोर्ट मिळतो. अर्जाबरोबरच लागणारी कागदपत्रेही मोजकीच आहेत. त्यामुळे नागरिकांनी पासपोर्ट लवकर हवा म्हणून तत्काळ श्रेणीतील अर्ज भरणे टाळावे. अत्यावश्यक कारणांसाठीच तत्काळची सुविधा असून, त्यासाठी कागदपत्रेही अधिक द्यावी लागतात. त्याचे शुल्कही अधिक आहे. सामान्य श्रेणीसाठी साधारण दोन कागदपत्रे आवश्यक आहेत. गरज ओळखून सामान्य आणि तत्काळ श्रेणीची निवड करावी,’ असे आवाहन डॉ. अर्जुन देवरे यांनी केले आहे.
एजंट, अनोळखी व्यक्तींना टाळा
– पासपोर्ट अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया अतिशय सोपी, सुलभ आहे.
– आवश्यक कागदपत्रे आणि पुरेशी माहिती जवळ असेल, तर पंधरा ते वीस मिनिटांत अर्ज भरता येतो.
– मात्र, या प्रक्रियेविषयी वाटणारी भीती आणि गैरसमजांमुळे अनेक नागरिक एजंटांची मदत घेऊ जास्त पैसे देऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेतात.
– अनोळखी व्यक्तीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांक, व्यक्तिगत ई-मेल अशी गोपनीय माहिती सोपवतात.
– या पार्श्वभूमीवर आम्ही एजंटांची नेमणूक केलेली नाही, असे स्पष्टीकरण पासपोर्ट कार्यालयाने दिले आहे.
पासपोर्टची मागणी वाढण्याची कारणे
– उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे वाढते प्रमाण.
– आंतरराष्ट्रीय परिषद, बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी.
– आयटी, सॉफ्टेवअर कंपन्यांमधील बैठकांसाठी परदेशगमन.
– उद्योग क्षेत्र विस्तारल्याने उद्योजकांच्या वाढलेल्या परदेशवाऱ्या.
– पर्यटनाच्या कक्षा रुंदावल्याने विदेश प्रवासावर वाढ़ता भर.
– परदेशस्थ मुले, नातेवाइकांकडे जाणाऱ्यांची वाढलेली संख्या.
पासपोर्टची वाढलेली मागणी लक्षात घेऊन यंदा आमच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून अर्ज स्वीकारले. वेळोवेळी विशेष पासपोर्ट मेळाव्यांचेही आयोजन करण्यात आले. दैनंदिन अपॉईंटमेंटही वाढवल्या. अचानक परदेशगमनाची संधी मिळालेल्यांनाही तत्काळ मदत केली. त्यामुळे अधिकाधिक अर्जदारांना वेळेत पासपोर्ट देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.- डॉ. अर्जुन देवरे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे पासपोर्ट विभाग