अयोध्या येथील राममंदिरात राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणासाठीच्या अक्षता कलशाचे सध्या सर्वत्र स्वागत व पूजन होत आहे. नाशिकमध्ये या कलशाचे पूजन करण्याचा कार्यक्रम मुक्त विद्यापीठात करण्यासाठी ‘अभाविप’ने विद्यापीठाकडे मागणी केली होती. तसेच कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी या कलशाचे पूजन करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार विद्यापीठाने या उपक्रमाचे परिपत्रक काढले होते. परंतु विद्यापीठात हा उपक्रम घेण्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करीत वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड यांनी या पूजनाआधी विद्यापीठात जाऊन ‘सविधान जिंदाबाद…’, ‘धर्मनिरपेक्षता जिंदाबाद…’ अशा घोषणा देत निदर्शने केली.
तसेच कुलगुरू डॉ. सोनवणे यांची भेट घेत या कार्यक्रमाला विरोध केला व अशा कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत आक्षेप घेतला. याबाबत बोलताना वंचिन बहुजन आघाडीचे राज्य कमिटी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी सांगितले की, संविधानानुसार कोणत्याही शासकीय ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येत नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने या कार्यक्रमाचे परिपत्रक काढून संविधानिक धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन केले आहे. याबाबत विद्यापीठाने माफीनामा सादर न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. आमचा विरोध कलश पूजनाला नसून, हे पूजन विद्यापीठात करण्याला आहे.
याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधला असता, या उपक्रमात विद्यापीठाचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ‘अभाविप’च्या विनंतीमुळे विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित करण्याला परवानगी दिल्याचे विद्यापीठ प्रशासनाने याबाबत बोलताना सांगितले. विविध संघटनांनी विद्यापीठाच्या या उपक्रमातील सहभागाला विरोध केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यामध्ये सहभाग घेतला नाही. परंतु ‘अभाविप’मार्फत या कलशाचे विद्यापीठाच्या आवारातच पूजन करण्यात आले.