हायलाइट्स:
- नात्यातीलच व्यक्तीकडून विवाहितेचा विनयभंग
- ५५ वर्षीय आरोपी फरार
- संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
सातारा : घरात एकटी असल्याचा फायदा घेत नात्यातीलच एकाने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. बोरगाव परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पुनर्वसित गावात पीडित महिला एकटीच राहते. तिच्या पतीने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केलं आहे. तसंच पीडितेचा मुलगा त्याच्या मामाकडे वास्तव्यास असतो. सायंकाळी संबंधित महिला शेतातील कामावरून घरी येऊन स्वयंपाक करत होती. या वेळी तिच्या नात्यातीलच ५५ वर्षीय व्यक्ती तिच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन करून तिचा विनयभंग केला.
महिलेने आरडाओरडा केल्यानंतर संशयिताने घटनास्थळाहून पलायन केलं.
या घटनेची माहिती महिलेने नातेवाईकांना दिल्यानंतर रात्री त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. त्यानंतर संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, नात्यातील व्यक्तीने केलेल्या या विकृत कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.