कोल्हापुरात २ तर हातकणंगलेमध्ये १ सभा होणार
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही आता पासूनच तयारीला लागले आहेत. एका बाजूला महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ जानेवारीपासून राज्यभर शिवसंकल्प यात्रा करणार आहेत. तर महविकास आघाडीच्या उमेदवार निवडून यावा, यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे ही दौऱ्याला सुरूवात करत असून ते ९ आणि १० जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचे कोल्हापूरमध्ये दोन तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक अशा तीन सभा घेण्याचे नियोजन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली असून सभेची तयारी तसेच कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांना वाटून देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांची तोफ शिंदे गटासोबत गेलेल्या दोन्ही खासदारांवर धडाडणार
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत गेले. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विद्यमान खासदारांना पाडू, असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर विद्यमान दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने या दोन्ही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आपला दावा सांगितला आहे.
मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे या जागावाटप बैठकीत ही जागा कोणाला जाणार याकडे तर सर्वांची उत्सुकता लागून राहिलेच आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून या दोन्ही मतदारसंघ मजबूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली असून या दोन्ही सभांमध्ये आदित्य ठाकरे यांची तोफ शिंदे गटासोबत गेलेल्या दोन्ही खासदारांवर धडाडणार असून आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.