…म्हणून पूरग्रस्त शेतकरी संतापले; थेट काँग्रेस भवनावर मोर्चा

हायलाइट्स:

  • अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही
  • सांगली जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
  • पिकांसह शेतकरी काँग्रेस भवनावर पोहोचले

सांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला महिना उलटला तरी अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. गेल्या तीन आठवड्यात सांगली जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी पुरात खराब झालेला ऊस आणि सोयाबीनसह काँग्रेस भवनावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकार मदत देणार का? असा सवाल विचारत राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मदत देणारच नव्हता, तर दौरे करून शेतकऱ्यांची चेष्टा का केली? अशी विचारणाही संतप्त शेतकर्‍यांनी केली आहे.

महापुराने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. महापूर ओसरताच पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक नेत्यांचे दौरे झाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर पूरग्रस्तांना तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात अजूनही मदत मिळालीच नाही. सरकारकडून मदत देण्यात दिरंगाई होत असल्याने हवालदिल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. गेल्या तीन आठवड्यात सांगली जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच मदत देणार का? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्यात आला. पुराने खराब झालेल्या पिकांसह शेतकरी काँग्रेस भवनावर पोहोचले.

chandrakant patil criticizes shiv sena: शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे; चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

यावेळी बोलताना पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘महापुरात बुडालेला ऊस, भाजीपाला कुजून गेला आहे. महिना उलटला तरी एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार जागे होणार का? पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शेतकरी पत्नी, मुले, जनावरांसह रस्त्यावर उतरतील. सरकार निव्वळ नव्या घोषणांचा रतीब घालत आहे. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ६५ रुपयांची मदत जाहीर करून थट्टा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून २०१९ प्रमाणे मदत जाहीर केली. प्रत्यक्षात एक रुपयाही मिळालेला नाही. आधीच करोनामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. नागठाणेतील तरुण शेतकरी, अंकलखोपला दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारच याला जबाबदार आहे. १५ दिवसांत मदत दिली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.’

दरम्यान, यावेळी महावीर चव्हाण, दादा तामगावे, नातगोंड पाटील, माणिक आवटी, शीतल पाटील, बंडु शेटे, सतीश पवार, रेखा पाटील, अभिमन्यू भोसले, आदी उपस्थित होते.

Source link

sangali floodsangali newsशेतकरी आंदोलनसांगलीसांगली पूर
Comments (0)
Add Comment