या मुलाखतीदरम्यान माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचा विषय निघाला. यावेळी माधुरी दीक्षितला तुमच्या बकेट लिस्टमध्ये काय आहे? लोकसभा निवडणूक लढवणं, तुमच्या बकेट लिस्टमध्ये आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर माधुरी दीक्षितने तात्काळ ‘नाही’ असे उत्तर दिले. मी लोकसभा निवडणूक लढवणे, हा दुसऱ्यांच्या बकेट लिस्टचा भाग असेल. पण तो माझ्या बकेट लिस्टचा भाग नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की, मी कुठूनतरी लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. पण राजकारण ही माझी आवड नाही, असे माधुरीने स्पष्ट सांगितले.
यावर श्रीराम नेने यांनाही लगेचच प्रश्न विचारण्यात आला. माधुरी दीक्षित निवडणुकीला उभ्या राहिलेल्या किंवा खासदार झालेल्या पाहायला आवडेल का, असा प्रश्न श्रीराम नेने यांना विचारण्यात आला. त्यावर श्रीराम नेने यांनीही तुर्तास राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले. यू नो, आम्ही त्या बांधाचे नाही. आम्ही सध्या अनेक नवनव्या गोष्टी हाती घेतल्या आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टींमध्येच बिझी असल्याने इतर गोष्टींना वेळ नाही, असे सांगत श्रीराम नेने यांनी माधुरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकला.
माधुरी दीक्षित भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा
मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील माधुरी दीक्षित हिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. तेव्हापासून माधुरी दीक्षित ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकते, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, माधुरी दीक्षितने नंतरच्या काळात राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून माधुरी दीक्षितला उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, असेही सांगितले जाते. या मतदारसंघात साई उत्सवाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित हिचे बॅनर्स लागले होते. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.