नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पाटर्यामध्ये अंमली पदार्थांची विकी व सेवन होते. त्याकरीता अशा पाटर्यांवरती नजर ठेवून कडक कारवाई करण्याबाबत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेला मध्यरात्री कासारवडवली खाडी किनारी एका निर्जनस्थळी दोन तरुणांनी तरुणाईकरिता अंमली पदार्थाच्या विक्रीसह रेव पार्टीचे आयोजन केले आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या टीमने पार्टीस्थळी छापा मारला. याठिकाणी ९० पुरूष व ५ महिला या अंमली पदार्थाचे सेवन करून मदयधुंद अवस्थेत डिजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या इव्हेंटचे आयोजन करणा-या दोन तरुणांना ताब्यात घेवुन त्या दोघांकडून चरस ७० ग्रॅम, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर,वाईन, व्हिस्की असा दारू व अमली पदार्थांचा आठ लाख तीन हजार ५६० रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला.
२९ मोटार सायकली घटनास्थळी
या रेव पार्टीचे आयोजन केल्यानंतर तरुणाईला सोशल मीडियावरून घटनास्थळाचा पत्ता पाठवण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मीरारोड अशा भागातून तरुण-तरुणी या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने आले होते. घटनास्थळी २९ मोटारसायकली आणि गांजा पिण्याचे साहित्य आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई
पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात रेव पार्टी होत असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांचेकडे कोणतेही अंमली पदार्थ विकी, सेवन अथवा रेव पार्टीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.