Pune News: वीस कैद्यांचे ‘तळोजा’त स्थलांतर; येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी निर्णय

म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा कारागृहात पूर्ववैमस्यातून चार कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याच्या पोटात कात्री भोसकून खून केल्याची घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सुरक्षेची सर्वतोपरी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

खून केलेल्या कैद्यांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रतिहल्ला होण्याची शक्यता असल्याने कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशाने २० कैद्यांना बाहेरील जिल्ह्यातील कारागृहात स्थलांतरित केले आहे. कारागृहाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक बराकीची आणि संशयित कैद्यांची सुरक्षा रक्षकांकडून नियमित कसून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अनिकेत श्रीकृष्ण समदुर (वय २२), महेश तुकाराम माने (वय २४), आदित्य संभाजी मुरे (वय ३२) आणि गणेश हनुमंत मोटे (वय २४) या न्यायाधीन कैद्यांनी पूर्ववैमस्यातून महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) याच्या पोटात कात्री भोसकून आणि बिजागिरीने मानेवर वार करून खून केला. कारागृहात कैद्यांनी कैद्याचा खून केल्याने मोठी खळबळ माजली होती. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.

कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा कारागृहातील खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खून करणारे कैदी आणि त्यांच्या साथीदारांवर चंदनशिवे टोळीतील किंवा साथीदारांकडून बदला म्हणून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खून करणारे कैदी आणि त्यांचे साथीदार असे एकूण २० कैद्यांना येरवडा कारागृहातून प्रत्येक जिल्ह्यातील कारागृहात स्थलांतरित करण्यात आले.

येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे असल्याने इतर कारागृहातून तीन अधिकारी आणि ३१ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर येरवडा कारागृहात बोलावून घेण्यात आले आहे. याशिवाय करागृहाच्या बाहेर आणि आतील तट भिंतींच्या सुरक्षेसाठी २२ होमगार्ड तैनात केले आहेत. कारागृहाबाहेर कैद्यांचे नातेवाईक आणि कैदी मुलाखतीला येणाऱ्या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
येरवडा कारागृहात कैद्याच्या हत्येने खळबळ: मानेवर कात्रीने भोसकून जागीच संपवलं
चंदनशिवेचा खून करण्यापूर्वी आरोपी कैद्यांनी कटिंगची कात्री लपवून ठेवली होती. त्यामुळे कारागृह प्रशासनाने प्रत्येक बराकीची आणि संशयित कैद्यांची नियमित कसून तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. कारागृहाच्या सीमा भिंतीच्या आत आणि बाहेरील बाजूने दर तीन तासांनी गस्त घालण्यासाठी एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती केली आहे. दिवसरात्र दर तीन तासांनी पथक कारागृहाभोवती गस्त घालणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

कारागृह महानिरीक्षकांचा कैद्यांशी संवाद

विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी येरवडा कारागृहात भेट देऊन कैद्यांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले. कारागृहात हाणामारी केल्यास कडक कारवाई करण्याची ताकीद दिली. या वेळी सुपेकर यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा बारकाईने आढावा घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.

Source link

Pune crime newsPune newstaloja jailyerwada central jailYerwada Central Jail pune
Comments (0)
Add Comment