आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे होत असून शनिवारीही हीच स्थिती होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा मतदारसंघ असल्याचे ठाम प्रतिपादन काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शनिवारी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना केले. अरविंद सावंत हे मोदीलाटेत निवडून आलेले खासदार असून त्यावेळी मी इतरांच्या तुलनेत कमी फरकाने पराभूत झालो, असे सांगतानाच दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे संकेत देवरा यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यासंदर्भात शनिवारी देवरा यांनी महाराष्ट्र टाइम्सकडे सविस्तर भूमिका मांडली. ‘महाविकास आघाडीत काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष आहे, हे विसरून चालणार नाही. जागावाटपाबाबत आम्ही आमची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली आहे. या संदर्भात नागपूर येथे सभेच्यावेळीही चर्चा झाली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. आज दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर देवरा कुटुंब आणि या मतदारसंघाचे नाते काय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मुरली देवरा आणि मी या मतदारसंघासाठी वर्षानुवर्षे काम करीत आलो आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचे अधिक प्राबल्य असून त्याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
अनेक प्रश्न प्रलंबित
दक्षिण मुंबई मतदारसंघातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे देवरा म्हणाले. या मतदारसंघात गृहनिर्माण, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, चाळींच्या पुनर्विकासासह कोळीवाड्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाले नसून याबबात अरविंद सावंत अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. अरविंद सावंत हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी वेळोवेळी त्यांच्या पक्षाची भूमिका ठोसपणे मांडली आहे. परंतु मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले, असे ते म्हणाले.