रविवारी साजऱ्या होत असलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी शनिवारीच बंदोबस्ताचे चक्रव्यूह आखण्या आले. दारूड्यांना न सोडण्याचा इशाराचा देण्यात आला असून, कुटुंबासह जाणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
फुटाळा, धरमपेठसह तरुणाई जमा होणाऱ्या ठिकाणीही पोलिसांची विशेष गस्त ठेवण्यात येणार आहे. महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांना थेट कोठडीत डांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ३७ जणांनी थर्टी फस्टच्या पार्टीसाठी परवानगी मागितली आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. समाजमाध्यमांवरून विनापरवानगी पार्टीची जाहिरात देणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. पार्टी असलेली ठिकाणे, हॉटेल्स मालकांना महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यासही बजावण्यात आले असून साध्या गणवेशात महिला पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत. जामिनावर कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’ आहे. नागरिकांनी उत्साहात व शांततेत नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
थर्टी फर्स्टच्या सायंकाळी ६ वाजतापासून ते १ जानेवारी सकाळी ६ वाजतापर्यंत शहरातील सहा उड्डाणपूल आणि दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. फुटाळा तलाव परिसरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर, वायुसेनानगर आणि फुटाळा वस्ती यांना जोडणाऱ्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीला बंदी असेल. लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौकदरम्यान दोन्हीकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. सीताबर्डीतील शहीद गोवारी उड्डाणपूल, सदर उड्डाणपूल (काटोल रोड, मानकापूर), सक्करदरा उड्डाणपूल, पाचपावली उड्डाणपूल, मेहदीबाग उड्डाणपूल, मनीषनगर उड्डाणपूल (वर्धा रोड) या उड्डाणपुलांवरील वाहतूकही वाहनांसाठी बंद असणार आहे.
असा राहील बंदोबस्त
ड्रंकन ड्राइव्हसाठी भरारी पथक : १५०
बंदोबस्तात तैनात अधिकारी व कर्मचारी : २,५००
नाकाबंदी : ५० ठिकाणी
जीप पेट्रोलिंग : १०० ठिकाणी
बीट मार्शल : १५० ठिकाणी
गुन्हे शाखा पथक : १२
बॉम्ब शोधन नाशक पथक : ४
वाहतूक पोलिस : १५ पीआयसह ३५० कर्मचारी