‘इमेजिंग बायोबॅक फॉर कॅन्सर’ या प्रकल्पामध्ये रुग्णांच्या रेडिओलॉजी, तसेच पॅथालॉजी चाचण्यांमधील स्लाइडचे जतन करण्यात येत आहे. त्यामुळे आजाराच्या निदानासह वैद्यकीय उपचारांचे पर्याय निवडताना अधिकाधिक अचूक वैद्यकीय निष्कर्षापर्यंत जाता येईल, असा विश्वास टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे व्यक्त केला. प्रत्येक वर्षी हजारो रुग्ण कॅन्सरवर मात करण्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेतात. उपचारप्रक्रियेतील रेडिओलॉजी आणि पॅथालॉजी इमेजेस, तसेच स्लाइड्सचे जतन या इमेजिंग बॅंकमध्ये केले जात आहे.
भारतीय रुग्णांमधील कॅन्सरमध्ये या प्रणालीचा वापर करताना आजाराची पार्श्वभूमी, तो होण्याची कारणे, अनुवांशिकता या सर्व घटकांचा त्या संदर्भाने विचार करावा लागतो. पाश्चिमात्य देशांतील सर्व निकष, तसेच्या तसे वापरता येत नाहीत. त्यामुळे ही डाटा बॅंक आपल्या रुग्णांमधील कॅन्सर केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावर ती मार्गदर्शक ठरावी, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. आता प्राथमिक टप्प्यामध्ये याचा वापर सुरू झाला आहे. पुढे प्रतिसाद लक्षात घेऊन त्याचा वापर हळूहळू वाढत जाईल. ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, याकडे डॉ. गुप्ता यांनी लक्ष वेधले.
अचूकतेकडे जाण्याचा प्रयत्न
रुग्णस्नेही भाषेमध्ये वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांना कॅन्सरच्या उपचारपद्धतीमधील एआय प्रणाली हे मदतगार तंत्रज्ञान ठरेल. कॅन्सरचे स्वरूप, तसेच रुग्णनिदान केल्यानंतर कोणत्या प्रकारचे उपचार द्यावे, याचा निर्णय तज्ज्ञांकडून अनुभवाच्या आधारे घेतला जातो. एआय प्रणालीमुळे निदानप्रक्रियेत सुटून गेलेल्या वैद्यकीय विश्लेषणाचे कंगोरेही हाती येतील. अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड देऊन कोणत्या प्रकारचे उपचार रुग्णांसाठी जास्त मदतगार ठरू शकतील, याच्या अधिकाधिक जवळ जाणारा पर्याय या एआयच्या वापरामुळे मिळू शकेल.
रुग्णाचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, तो किती पसरला आहे, यासोबत त्यात इतर काही अन्य घटकांची गुंतागुंत आहे का, याची उकल अधिक जलदरीत्या होणार आहे. देशातल्या ज्या भागामध्ये कुशल मनुष्यबळाची उपलब्धता नाही, तिथे हा उपाय मदतगार ठरू शकेल. चेतापेशी, ऊती व इतर घटक वेगळे कसे ओळखायचे, कॅन्सरकारक घटक कोणते याची माहिती या प्रणालीला दिल्याने रुग्णांची तपासणी जास्त अचूक पद्धतीने करणे शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हा पर्याय नाही तर मदत
भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर वैद्यकीय तज्ज्ञांची जागा घेतली जाईल का, असाही प्रश्न उपस्थित होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काळात कॅन्सरची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक आणि खासगी पातळीवर रुग्णालयांची उपलब्धता वाढणार आहे. तितके कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होणार नाही. जिथे निदानाच्या, उपचारामधील निश्चितीकरणाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे हे तंत्रज्ञान निश्चितपणे साह्यभूत ठरेल. रुग्णहिताचे व गोपनीयतेचे पूर्ण निकष यात पाळण्यात येतील, याकडेही डॉ. गुप्ता यांनी लक्ष वेधले.