श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर काल रविवारी सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो आणि महिंद्रा क्झायलो या दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण धडकेत दोन मुलांसह एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. शेहबाज अजिज शेख (३०), गाझी रउफ शेख (१३), लुझेन शोएब शेख (१३) अशी तिन्ही मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. तर रिजवाना अजिज शेख (५७), रिम शोएब शेख (३२), फायजा शोएब शेख (९), शादिन शोएब शेख (११), सना अब्दुल रौफ शेख (३७), अब्दुल रहीम शेख (८), मदिहा शेहबाज शेख (२७) असे जखमी झालेल्यांची नावे असून सर्वजण बैलबाजार, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे येथील रहिवासी आहेत.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी महिंद्रा क्झायलो क्र. एमएच ०४ ईडी ७१६ मधून येत होते. घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने नगर कडून दौंडकडे सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो क्र. एचआर ५५ एपी ९९६४ सोबत समोरासमोर भीषण धडक झाली.
या भीषण धडकेत शेहबाज अजिज शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर गाझी रउफ शेख, लुझेन शोएब शेख या दोन लहान मुलांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. तर सात जणांना गंभीर जखमी झाल्याने नगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच भुषण बडवे, अनिल चौधरी, बापुराव निभोरे, विनायक चौधरी, अंकुश लगड, अजय राजेंद्र जाधव, डॉ. पानसरे, जवळील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मोलाची मदत केली.