पेटंटसाठी अमेरिकेत अर्ज
नारायण पेठेतील रहिवासी सुरेश पेठे यांनी ‘प्राइम सिस्टीम्स व्हर्च्युअल कार्ड’ नावाने अॅप्लिकेशन तयार केले आहे. पेठे उद्योजक असून, ‘बँक व वित्त’ क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी हे अॅप्लिकेशन साकारले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाने त्यांच्या संकल्पनेसाठी पेटंट प्रमाणपत्र दिले असून, अमेरिकेच्या पेटंट कार्यालयानेही त्यांचा अर्ज दाखल करून घेतला आहे.
गैरव्यवहार टाळण्याचा उद्देश
देशात क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या मोठी आहे. एटीएममधून पैसे काढणे, ऑनलाइन खरेदी करणे, दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे व्यवहार करणे, कार्ड डिजिटल ‘वॉलेट’शी संलग्न करून ऑनलाइन व्यवहार करणे, आदींचा त्यात समावेश होतो. व्यवहारांसाठी कार्ड कायम जवळ बाळगावे लागते; तसेच ते चोरीला जाऊ नये, याची दक्षता घ्यावी लागते. कार्ड गहाळ झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, कार्ड क्रमांक-पिन चोरीला गेल्यास बेकायदा व्यवहार होऊ शकतात, कार्डचे क्लोनिंग करून ते ‘पॉस’ मशिनवर वापरले जाऊ शकते, यूजरची ओळखही चोरीला जाऊ शकते. त्यावर तोडगा काढण्यासाठी सुरेश पेठे यांनी मोबाइल अॅप्लिकेशन तयार करायचा निर्धार केला.
‘यूपीआय’द्वारेही व्यवहार
मुलगा भरत आणि सून तेजस्विनी यांची मदत घेऊन पेठे यांनी हे अॅप्लिकेशन साकारले. ‘या अॅप्लिकेशनमध्ये ग्राहकांना त्यांची सहा कार्डे ‘व्हर्च्युअल’ स्वरूपात बाळगता येतात. ग्राहकांना मोबाइल क्रमांक, पासवर्ड, पिन आदी माहिती देऊन हे कार्ड डिजिटली जतन करता येते. परिणामी प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज भासत नाही. ‘पॉस’ टर्मिनल, बँक ट्रान्सफर, एटीएममधून रोकड काढणे यांसह सर्व ‘यूपीआय पेमेंट चॅनेल्स’च्या माध्यमातून अतिशय सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने व्यवहार करता येतात,’ असे पेठे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
देशात क्रेडिट/डेबिट कार्डच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी साकारलेली ‘व्हर्च्युअल क्रेडिट/डेबिट कार्ड’ संकल्पना रिझर्व्ह बँक आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडे (एनपीसीआय) सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या व्यतिरिक्त सहकारी व खासगी बँकांकडेही त्यांनी या संकल्पनेचे सादरीकरण केले असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
– सुरेश पेठे
‘व्हर्च्युअल क्रेडिट/डेबिट कार्ड’चे फायदे
– प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज नाही.
– ‘क्लोनिंग करता येत नाही.
– मोबाइल चोरीला गेला, हॅक झाला, तरी ‘व्हर्च्युअल अॅप्लिकेशन’ यूजर आयडी, पासवर्डने सुरक्षित.
– ‘यूपीआय’द्वारे व्यवहार करता येतात.
– चुकीच्या, बेकायदा व्यवहारांना आळा बसेल.