विमा कंपन्यांशी सुधारित दरपत्रकाबाबत गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहेत. सुधारित नवीन दरपत्रकाला ३१ डिसेंबरपर्यंत मान्यता न मिळाल्याने सोमवारपासून ‘कॅशलेस’ची सुविधा तात्परती बंद करण्यात येत असल्याच्या माहितीचा फलकच पुण्यातील एका बड्या रुग्णालयाने रुग्णांसाठी लावला आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या खासगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. मात्र, ‘कॅशलेस’ची सुविधा देताना रुग्णालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील ‘कॅशलेस’ची सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची संख्या कमी होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांचे म्हणणे आहे.
काही वर्षांपूर्वी शहरातील सरासरी ३५० रुग्णालयांमध्ये ‘कॅशलेस’ची सुविधा सुरू होती. सद्यस्थितीत ही संख्या ८० ते १०० रुग्णालयांमध्ये सुरू आहे. लहान आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या खासगी रुग्णालयामध्ये जावे लागते. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांवर ताण येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतच हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने विमा नियामकांशी पत्रव्यवहार केला आहे. सर्वच रुग्णालयांत १०० टक्के ‘कॅशलेस’ सुविधा देण्याची मागणी केली आहे.
जाचक अटींमुळे ‘कॅशलेस’ रुग्णालयांची संख्या कमी होत आहे. कोणत्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे हा निर्णय रुग्णांचा असल्याने सर्व प्रकारच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असायला हवी. रुग्णालयांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यातून मार्ग काढायला हवा.
– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (पुणे शाखा)
शहरातील रुग्णालयांची संख्या
एकूण रुग्णालये : ७८०
कॅशलेस सुविधा असणारे : ८० ते १००
एकूण खाटा : १८ हजार ९००
आयसीयू खाटा : २ ते ३ हजार
व्हेंटिलेटर खाटा : ७५० ते ८००
‘कॅशलेस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय आणि विमा कंपनी यांच्यामध्ये करार लवकर होत नाही. सुविधा उपलब्ध झाल्यावर दर कमी दिले जातात; तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा खर्च अनेकदा मंजूर केला जात नाही. रुग्णांच्या हितासाठी ‘कॅशलेस’ सुविधेतील अडचणी तातडीने सोडविणे गरजेचे आहे.
– डॉ. मुकुंद पेनूरकर, व्यवस्थापकीय संचालक, संजीवन रुग्णालय
‘रुग्णालयात कॅशलेस’ची सुविधा सुरू करण्यासाठी काही नियम असतात. सुविधा सुरू करण्यासाठी रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर असणे आवश्यक असते. कॅशलेस’ची सुविधा देताना रुग्णालयांना काही अडचणी येत आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे.
– डॉ. के. एच. साळे, अध्यक्ष हॉस्पिटल असोसिएशन, पुणे