डिसेंबरमधील अखेरचा आठवडा नाताळ, सरत्या वर्षाला निरोपण देण्याचा काळ, नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त ठिकठिकाणी कार्निव्हलसारखे वातावरण असते. त्यानिमित्ताने घरांमध्ये सजावट केली जाते, विविध वस्तूंची खरेदी होते. लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छापत्रे दिली जातात. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते, त्यासाठी खर्च केला जातो. यानिमित्ताने यंदा बाजारात चांगली उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.
‘कॅट’च्या म्हणण्यानुसार, नाताळच्या आधीपासून बाजारात चांगली उलाढाल सुरू झाली होती. मुंबई शहर, उपनगर व ठाण्यात यानिमित्ताने कपडे खरेदी, गृहसजावटीचे साहित्य, रोषणाई यांच्या खरेदीचा जोर दिसला. चांदणीच्या आकारातील रोषणाईच्या माळा ३० ते ४० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत किंमतीच्या आहेत. त्यांना चांगली मागणी असल्याचे दिसले. चॉकलेटचे आकर्षक पॅक, विविध प्रकारचे केक, पेस्ट्री यांनादेखील आठवडाभर जोरदार मागणी होती. विशेषत: रविवारी वर्षअखेरच्या दिवशी अनेक घरांमध्ये, इमारतींच्या गच्चीवर नववर्ष स्वागतासाठी पार्टींचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी झालेल्या विक्रीमुळे मोठी उलाढाल झाली.
‘कॅट’चे महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले की, ‘यंदा नवीन कपड्यांची खरेदी अधिक प्रमाणात झालेली दिसली. तसेच बाहेरगावी, हॉटेल किंवा रेस्तरांमधून जाऊन नववर्ष स्वागत करण्याऐवजी घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मेजवान्यांचे आयोजन अधिक दिसले. त्यामुळे घरोघरी पार्टीसाठी विविध प्रकारची खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक होता. त्यातून आवश्यक त्या साहित्याची विक्री होऊन ती उलाढाल अधिक झाली. या सर्व खरेदीच्या निमित्ताने देशभरात ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. तर महामुंबई क्षेत्रातील ही उलाढाल जवळपास ९०० कोटी रुपयांच्या घरात होती.’