शुभवार्ता! आता कचरा जमा होणारी ठिकाणेच होणार नष्ट, रात्रपाळीचे कर्मचारी नेमणार, कितपत होणार फायदा?

पुणे : शहरातील बहुतांश ठिकाणच्या कचरापेट्या काढून टाकण्यात आल्या आहेत; तरीही शहरात अनेक ठिकाणी विशेषतः रस्त्याच्या कडेला, झाडांखाली; तसेच झोपडपट्ट्यांमध्ये अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागतात. आता अशी कचरा जमणारी ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट्स) नष्ट करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशी ठिकाणे स्वच्छ व सुशोभित करून तिथे पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल.

सार्वजनिक ठिकाणी; तसेच झोपडपट्ट्यांमध्ये, रस्त्यांच्या कडेला अडगळीच्या ठिकाणी क्रॉनिक स्पॉट्स मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका आहे. यामुळे ‘स्वच्छ भारत सर्वेक्षणा’अंतर्गत महापालिकेच्या कामगिरीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे हे क्रॉनिक स्पॉट्स नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष कार्यप्रणाली तयार केली असून, त्या अंतर्गत क्रॉनिक स्पॉट्स नष्ट करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर सोपवली आहे.

‘क्रॉनिक स्पॉट्स’बाबत होणाऱ्या कार्यवाहीसाठी ‘परिमंडळ एक ते तीन’साठी उपअभियंता नितीन शिंदे यांची, तर ‘परिमंडळ चार व पाच’साठी प्रमुख आरोग्य निरीक्षक इमामुद्दिन इनामदार यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी, समन्वयकांवर नियंत्रक म्हणून कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे काम पाहतील. हे अधिकारी दर सोमवारी क्रॉनिक स्पॉट्सचा अहवाल सादर करतील.

स्वच्छ सेवा सहकारी संस्थेने दिलेली क्रॉनिक स्पॉट्सची यादी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाठवली आहे. या यादीनुसार त्या त्या स्पॉट्सवर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सेवकांची नियुक्ती करण्यात येईल. या क्रॉनिक स्पॉट्सवर कचरा नेमका कोठून येतो, हे शोधून आवश्यकतेनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. या भागात कचरा स्वीकारण्यासाठी यंत्रणा आहे किंवा नाही, याची खातरजमा केली जाईल. तेथील नागरिकांना स्वच्छ अथवा महापालिकेच्या घंटागाडीशी जोडले जाईल. याद्वारे शहरात १०० टक्के कचरा संकलन व कचरा वर्गीकरणाचे ध्येय साध्य करता येईल, असे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घटना! कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक
रात्रपाळीचे कर्मचारीही नेमणार

– क्रॉनिक स्पॉट्स नष्ट करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची.
– या जागांची स्वच्छता व सुशोभीकरण केले जाईल.
– या जागी कचरा टाकू नये, असे फलक लावले जातील.
– क्रॉनिक स्पॉट्ससाठी रात्रपाळीतही कर्मचारी नेमले जातील.
– ते या जागांवर लक्ष ठेवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील.
– परिसरातील नागरिकांना पुरेशा कचरा संकलन सुविधा पुरवण्यात येतील.

सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी आपल्या हद्दीतील क्रॉनिक स्पॉट्स तातडीने नष्ट करायचे आहेत; तसेच आपल्या कार्यक्षेत्रात यापुढे एकही क्रॉनिक स्पॉट आढळणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Source link

Chronic spotsPune newsक्रॉनिक स्पॉटघनकचरा व्यवस्थापनपुणे महापालिका प्रशासनस्वच्छ भारत सर्वेक्षण
Comments (0)
Add Comment