गोदा महाआरतीला ‘अयोध्ये’चा मुहूर्त? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणेची शक्यता

नाशिक : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होत असतानाच नाशिककरांसाठी देखील २२ जानेवारी हा दिवस संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. बहुप्रतीक्षित गोदावरी महाआरतीसाठी याच मुहूर्ताची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ जानेवारीच्या दौऱ्यात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे २२ जानेवारीच्या सायंकाळपासून महाआरतीचे स्वर गुंजण्याची आशा निर्माण झाली आहे.

नाशिकनगरी ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुणीत झाली आहे. माता सीतेच्या अपहरणासह शूर्पणखेचे नाक कापणे, यासारखे रामायणातील काही प्रसंग नाशिकनगरीत घडले. पंचवटीतील तपोवनात आजही रामायणातील अनेक स्मृतींचे जतन केले गेले आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेची नासिका (नाक) कापले म्हणून ही नगरी ‘नासिक’ नावाने ओळखली जाते असे पौराणिक संदर्भ आहेत. रामायणातील या एकूणच पार्श्वभूमीने देशातच नाही, तर जगभरात नाशिकचे अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व वाढविले आहे. रामाचं आणि नाशिकचं नातं अतूट आणि अजरामर आहे. दक्षिणवाहिनी गंगा गोदावरी नाशिकमधूनच प्रवाहीत होत असल्याने गोदावरीचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजा दशरथांच्या अस्थींचे विसर्जन पवित्र रामकुंडात झाल्याची श्रद्धा आहे. याच रामकुंड परिसरात वाराणशी, हरिद्वारच्या धरतीवर गोदा महाआरती व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शहरातील आमदारांनी त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. या विषयाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. परंतु, महाआरती प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नाही. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील सोहळ्याच्या मुहूर्तावरच नाशिकमध्ये गोदा महाआरतीचा शुभारंभ केला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. योगायोगाने या सोहळ्याच्या १० दिवस आधी १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यातच गोदा महाआरतीच्या शुभारंभाची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, निमंत्रितांशिवाय अयोध्येत येऊ नका, मोदींची रामभक्तांना विनंती
नित्य खर्चासाठी निधीची गरज

गोदा महाआरतीसाठीच्या समितीमध्ये महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकामच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अभियंता, उपवनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांसह पुरोहित संघ व विविध क्षेत्रातील काही मान्यवरांचा समावेश केला आहे. दररोज सायंकाळी सातला छोट्या स्वरूपात आरती होते, अशी माहिती पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी दिली. परंतु, महाआरतीला भव्य स्वरूप देण्यासाठी नित्य निधीची गरज असून, लोकप्रतिनिधींसह पुरोहित संघाने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे पाठपुरावा करून ४२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे.

प्रविण बिडवे यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

ayodhya ram templenashik municipal corporationNashik newsगोदा महाआरतीगोदा महाआरती नाशिकरामकुंड नाशिक
Comments (0)
Add Comment