शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारीला पिंपरी-चिंचवड येथे रंगणार आहे. सहा जानेवारीला (शनिवारी) संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही शरद पवार उपस्थित असतील.
शनिवारी आणि रविवारी (सहा, सात जानेवारी) चालणाऱ्या संमेलनात यंदा नाट्यरसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. ‘करून गेला गाव’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘तुझं आहे तुझंपाशी’, ‘मर्डरवाले कुलकर्णी’, ‘चाणक्य’, आदी गाजलेल्या व्यावसायिक नाटकांसोबतच ग्रिप्स थिएटर, प्रायोगिक नाटके, बालनाट्ये, संगीत रजनी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाटकांविषयीची मुलाखत, परिसंवाद आदी कार्यक्रमांची मेजवानी घअनुभवता येईल.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाट्यसंमेलनाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
राजकीय नेत्यांचा प्रचार?
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सत्ताधारी पक्षांतील सर्वच बडे नेते हजेरी लावणार आहेत. या मुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाट्यसंमेलनातही रसिकांसमोर नेतेमंडळींकडून जोरदार बॅटिंग होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांना ही संधी मिळणार असल्याने नाट्यसंमेलनासारख्या व्यासपीठाची संधी दोन्हीकडील नेते सोडणार नाहीत, अशीच चर्चा रंगली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News