हायलाइट्स:
- आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालयाचे संचालक जबाबदार.
- करोनाकाळातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
- रुग्णांच्या जीवन सुरक्षेला आमचे सर्वाधिक प्राधान्य: ऊर्जामंत्री
नागपूर:करोना काळात राज्यात नागपूर, भंडारा, मुंबई आदी ठिकाणी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे पुढे आल्यानंतर आता अशा घटनांसाठी रुग्णालयाच्या संचालकांना जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ( Maharashtra Govt Decision On Hospital Fire )
वाचा:मुख्यमंत्र्यांसमोरच प्रताप सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण…
काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. आगीच्या दोन्ही घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे पुढे आले होते. त्यानंतर विद्युत विभागाकडून राज्यभरातील रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना देण्यात आले. कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थीएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने निर्देश देण्यात आले होते. तसेच यात आता अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.
वाचा:भाजप आणि शिवसेनेत अंतर का वाढलं?; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
या निकषांचे पालन करावे लागणार
राज्य सरकारच्या निर्देशानंतर आता रुग्णालयांना उच्चदाब व मध्यमदाब फीडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे, केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. तसेच १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ‘ना हरकत प्रमाणपत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडिट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्निशमन यंत्रणा लावणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य: ऊर्जामंत्री
करोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश दिले असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
वाचा:परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण…