निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत वाढवली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मतदारयादी शुद्धीकरण करण्यास मुदत मिळाली आहे. परिणामी, निवडणूक विभागाने दुबार नावांसह छायाचित्रांचा शोध युद्धपातळीवर घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात शनिवारपर्यंत सुमारे नऊ लाख पाच हजार ५५९ इतक्या जणांची दुबार छायाचित्रे असल्याचे आढळले आहे. दोन लाख ५६ हजार ४६० जणांनी दुबार नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
दुबार छायाचित्रांत ठाणे अव्वल, पुणे दुसरे
जिल्हानिहाय दुबार छायाचित्रांची स्थिती पाहता दुबार छायाचित्रे देण्यात ठाणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला असून, त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्याने क्रमांक पटकविला आहे. सिंधुदुर्गमध्ये १,७८४ दुबार छायाचित्रे आढळली आहेत. त्याशिवाय रत्नागिरी, गडचिरोली, हिंगोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांतही कमी प्रमाणात छायाचित्रे दुबार आढळली आहेत. मतदारयाद्यांमध्ये दोन ठिकाणी एकाच व्यक्तीची छायाचित्रे दोनदा आढळली आहेत. दोन्ही छायाचित्रे एकच आहेत का, याची पडताळणी करून खात्री करण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. त्यात येत्या १२ जानेवारीपर्यंत दुबार छायाचित्रे; तसेच दुबार नोंदणी वगळण्याचे काम करण्यात येणार आहे.
दुबार नोंदणीत पुणे पहिले
मतदारयादीत छायाचित्राप्रमाणे दुबार नोंदणी केल्याचे आढळले आहे. त्याला डेमोग्राफिक सिमिलरी एंट्री’ (डीएसई) असे म्हटले जाते. एकाच विधानसभा मतदारसंघात मतदारयादीत नाव, जन्मतारीख दोन केंद्रांमध्ये एकसारखी असल्यास त्यांची खात्री करण्यात येणार आहे. दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्यास त्यापैकी कोणत्या एका ठिकाणी नाव ठेवायचे, याची माहिती घेऊन दुसऱ्या ठिकाणची नोंद डिलिट केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारपर्यंत सुमारे २८ हजार ६७७ जणांची दुबार नोंदणी झाली आहे. या यादीतील दुरुस्त्या करण्याचे; तसेच नावे वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
राज्यातील दुबार नावांसह दुबार छायाचित्रे असलेल्या जिल्ह्यांची स्थिती
जिल्हे दुबार छायाचित्रे
सातारा २,३९,२३७
ठाणे १,५०,८१३
पुणे १,४१,३९०
नागपूर २६,९२०
जळगाव २३,६४४
बुलढाणा २१,८८९
छत्रपती संभाजीनगर २१,२३९
कोल्हापूर १९,७२८
नांदेड १८,१६७
अमरावती १७,७९२
एकूण दुबार छायाचित्रे ९,०५,५५९
जिल्हे दुबार नावे
पुणे २८,६७७
ठाणे २७,०९०
कोल्हापूर १३,१२३
नागपूर १०,७३६
सातारा १०,३५३
जळगाव ९,०६१
छत्रपती संभाजीनगर ७,६१३
अमरावती ६,७९४
नांदेड ६,१५६
बुलढाणा ४,८३२
एकूण दुबार नावे २,५६,४६०
राज्यातील मतदारयादीत अडीच लाखांची दुबार; तसेच नऊ लाखांची छायाचित्रे दोनदा आहेत. त्यांची पडताळणी करून येत्या १२ जानेवारीपर्यंत दुबार नावे वगळण्याचे काम करण्यात येईल. सध्या पडताळणीचे काम सुरू असून, त्यानंतरच २२ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र