आयएमडीतर्फे सोमवारी आगामी हिवाळी हंगामातील पाऊस आणि जानेवारीच्या तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. या अंदाजानुसार देशभरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, जानेवारीमध्ये देशभरात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ‘मध्य भारतासह महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ७५ टक्के आहे. जानेवारीत देशाच्या बहुतांश भागांमध्ये रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता ६५ टक्के आहे.’
– देशातील सर्वसाधारण तापमान २०२३ मध्ये सरासरीपेक्षा ०.६५ अंशांनी अधिक होते. २०१६नंतर २०२३ हे वर्ष आत्तापर्यंतचे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले.
– गतवर्षी सर्व हंगाम मिळून देशात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली.
– उत्तर हिंदी महासागरात २०२३ मध्ये सरासरीपेक्षा जास्त चक्रीवादळांची निर्मिती झाली. बंगालच्या उपसागरात चार (मोखा, हामून, मिधली, मिचौंग), तर अरबी समुद्रात दोन (बिपरजॉय, तेज) चक्रीवादळे तयार झाली. सहापैकी तीन चक्रीवादळांनी अत्यंत तीव्र श्रेणी गाठली.
मुंबईत कमाल तापमान सरासरीहून अधिक
थंडीची जाणीव होण्यासाठी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचाही पारा उतरण्याची गरज असते. मात्र यंदा डिसेंबरमध्ये थंडीने मुंबईकरांना हुलकावणी दिल्यानंतर जानेवारीमध्येही थंडी फारशी अनुभवायला मिळणार नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवला आहे. मुंबईसह कोकण विभागात किमान तापमान सरासरीहून अधिक असू शकते. या काळात केवळ किमान नाही तर कमाल तापमानही मुंबईसह कोकण विभागात सरासरीएवढे किंवा त्याहून अधिक असू शकेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीहून किंचित कमी असू शकते. मात्र कोकण विभागाला जानेवारीत फारसा तापमान दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News