थॅलेसेमियाग्रस्तांना दर २० ते ३० दिवसांनी रक्त द्यावे लागते आणि त्याचबरोबर सतत रक्त देऊन शरीरात जमा होणारे अतिरिक्त लोह शरीरारातून काढून टाकण्यासाठी ‘आयर्न चिलेशन’च्या गोळ्याही प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाला द्याव्या लागतात. विशेष म्हणजे अतिरिक्त प्रमाणातील लोह शरीरातून काढून न टाकल्यास विविध अवयव निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळेच या गोळ्या प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्ताला दर महिन्याला घ्याव्या लागतात आणि याच गोळ्यांचा प्रश्न जिल्हा रुग्णालयात उभा ठाकला आहे. वस्तुत: राज्य सरकारकडून या प्रकारच्या २५० ग्रॅमच्या ८० हजार व ५०० ग्रॅमच्या ७५ हजार अशा एकूण एक लाख ५५ हजार गोळ्यांचा पुरवठा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला झाला होता. मात्र या गोळ्यांचे वितरण सुरू होताच अनेक थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना विविध प्रकारच्या रिॲक्शन सुरू झाल्यानंतर या सगळ्याच गोळ्यांचे वितरण थांबवण्यात आले होते. या गोळ्यांचे वितरण थांबवण्यात आल्यानंतर २५० ग्रॅमच्या ५८,८०० व ५०० ग्रॅमच्या ७८,२०० अशा एकूण एक लाख ३७ हजार गोळ्या शिल्लक होत्या. या शिल्लक गोळ्या परत कंपनीला पाठवून देण्यात आल्या खऱ्या; परंतु त्या बदल्यात सरकारकडून दुसऱ्या गोळ्या उपलब्ध झालेल्या नाहीत आणि त्याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. हीच स्थिती राज्यभर आहे व सर्वत्र जुन्या गोळ्यांचे वितरण बंद करण्यात आलेले आहे. दरम्यान, थॅलेसेमियाग्रस्तांची परवड लक्षात घेऊन स्थानिक खरेदीतून या गोळ्या नंतर उपलब्ध करण्यात आल्या. मात्र या गोळ्या कधी असतात, तर कधी नसतात आणि संबंधित गोळ्यांचा दर्जा पूर्वी उपलब्ध झालेल्या गोळ्यांप्रमाणे नाही, असाही आक्षेप थॅलेसेमिया सोसायटीकडून घेतला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारडून नेहमीच्या गोळ्यांचा पुरवठा व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खरेदीची ऐपत फार कमी जणांची
प्रत्येक थॅलेसेमिया मेजर रुग्णाला महिन्याला रक्त द्यावे लागते व त्याचवेळी आयर्न चिलेशनच्या गोळ्याही द्याव्या लागतात. मात्र या गोळ्या सरकारी रुग्णालयातून मिळाल्या नाही तर त्या विकत घेण्याची ऐपत फार कमी रुग्णांच्या कुटुंबियांची असते. त्यामुळे सरकारी रुग्णालयातून या गोळ्या मिळाल्या नाही तर अनेकजण या गोळ्यांची खरेदी करण्यास टाळाटाळ करतात आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णांच्या वाट्याला येतात, असेही चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक खरेदीतून संबंधित गोळ्या घेतल्या जात आहेत व रुग्णांची अडचण होणार नाही, हे कटाक्षाने पाहिले जात आहे. ही खरेदी केली जात असल्यामुळेच आजघडीला १५ हजार गोळ्या स्टॉकमध्ये आहेत. तसेच कंपनीला परत केलेल्या गोळ्याही लवकरच मिळतील, अशी अपेक्षा आहे.-डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नेहमीच्या गोळ्या हव्या आहेत. सध्या मिळणाऱ्या गोळ्यांचा दर्जा पूर्वीच्या गोळ्यांप्रमाणे नाही. त्यामुळे पूर्वीच्या गोळ्या मिळाव्यात व नियमित मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. पुन्हा अगदी मोजक्या काही दिवसांपूर्वी पालकांना स्टॉक नाही म्हणून जिल्हा रुग्णालयात सांगण्यात आले होते. त्यामुळे कधी गोळ्या मिळतात, तर कधी मिळत नाही, अशी एकंदर स्थिती आहे.-अनिल दिवेकर, शहर सचिव, थॅलेसेमिया सोसायटी