जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला..

*(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

जळगाव: शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे. जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याचे चित्र ऑगस्ट महिन्यात होते. महिन्याच्या शेवटी दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे.असे असले तरी आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने अतीवृष्टी झालेल्या चाळीसगाव तालुक्यात मदत कार्यास वेग आला आहे. आतापर्यंत केवळ ५८ टक्केच पाऊस झाला आहे. तर धरणातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी जलसाठा झाला आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची जाणवेल असा अंदाज भुगर्भतज्ञ व्यक्त करीत आहेत.यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस शेतकऱ्यांसह सर्वानाच चकवा देत आहे. यंदा दमदार पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र तो पहिल्या महिन्यातच फोल ठरला. पंधरा जूननंतर खऱ्या अर्थाने पाउस सुरू झाला. जुलैमध्ये पून्हा पंधरा दिवस पावसाने ओढ दिली. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. मात्र जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले.परत जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १६ ऑगस्ट पर्यंत पावसाने ओढ दिली. पावसाचे वातावरण तयार होत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. अखेर १७ ऑगस्ट पासून पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला. नंतर ओढ दिली. ऑगस्टच्या शेवटच्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला.पाणी टंचाई मिटण्यासाठी व आगामी सिंचनासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. उडीद,मुगाची पिके वाया गेल्यानंतर आता कपाशी,ज्वारी, बाजरी, मका, तुर व सोयाबीन या पिकांवरच शेतकऱ्यांची मदार आहे.

Comments (0)
Add Comment