यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, अजित पवारांना रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना द्यायचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मला पालकमंत्रीपद मिळणारच नाही, अशी तजवीज केली, असा आरोप आव्हाड यांनी केला.
मविआ सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे मिळून पालकमंत्री ठरवत होते. त्यामध्ये शरद पवार यांची कोणतीही भूमिका नव्हती. मी त्यावेळी अजित पवार यांना भेटून सांगितलं होतं की, मला पालकमंत्रीपद द्या. त्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत:हून मला भेटले होते. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला रायगड हवं होतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला पालघरचं पालकमंत्रीपद द्यायला तयार होतो. जितेंद्र, मी फक्त तुझ्यासाठी पालघर सोडायला तयार झालो होतो. पण अजित पवार यांनी रायगडचे पालकमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. कारण त्यांना अदिती तटकरे यांच्यासाठी रायगड हवं होतं, त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना द्यायचे होते. त्यावेळी मी एकच प्रश्न विचारला होता की, मी काही ज्येष्ठ मंत्री नाही का? मी पक्षाचा कार्यकता नाही का? मला करोना झाला त्यावेळी मला दोन तासांमध्ये पालकमंत्रीपदावरून काढण्यात आले. त्यानंतर किती मंत्र्यांना करोना झाल्यावर त्यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले? अजित पवार यांना स्वत:ला करोना झाल्यावर त्यांना राजीनामा का दिला नाही? मी करोनातून बरा झालो ना, मेलो नाही ना, वर नाही गेलो ना? मग मला इतकी सावत्र वागणूक का देण्यात आली, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.