नायगाव (जि.सातारा) येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ आले होते. सावित्रीबाईंना वंदन करून त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर…?
मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ते टिकेल का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, चार-पाच आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे. त्यामुळे सरसकट आरक्षण मराठा समाजाला दिलं, तर ते एक दिवसही टिकणार नाही. परत त्याच रस्त्याने जायचं असेल, तर त्यावर मी काय बोलू? मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असून तो यशस्वी झाला पाहिजे.
मराठे ओबीसीत का नको? भुजबळ म्हणाले….
ओबीसी समाजाचे २० जानेवारीपासून आंदोलन सुरू होतंय. आमचं म्हणणं आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढेच आहे. एवढेसुद्धा आम्ही बोलायचं नाही म्हणजे खूप झालं. मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं द्या. त्यासाठी आयोग कामाला लागला आहे. त्याचं सर्वेक्षण सुरू आहे. त्याप्रमाणे द्या, दोन वेळा कायदा पुढे आला, त्याला पाठिंबा मी दिला.
सध्या ओबीसीत पावणेचारशे जाती आहेत. त्यामध्ये तुमचाही फायदा नाही आणि आमचाही नाही. त्यामुळे मराठ्यांनी ओबीसीत येऊ नये. वेगळे आरक्षण द्या, सुप्रीम कोर्टात ते अडकलं ते मिळावं, त्याला आमच्या ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा आहे.
‘बाबरी’च्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक नव्हते, यावर ठाकरे गटाचे खा.राऊत यांनी ट्विट केलंय. त्यात भाजपच्या उपस्थित नेत्यांनी बाबरी मशीद पाडू नये, यासाठी प्रयत्न केले होते असे म्हटलय. यावर भुजबळ म्हणाले, ‘मी तिथे गेलो नव्हतो. मी काय करू? तेथील शिवसैनिक गेले असतील. त्याबद्दल मी काय बोलू शकतो.