बॉक्स ऑफिसचा किंग कोण ठरणार? तिसऱ्या हिटसाठी सज्ज असणाऱ्या शाहरुखला पहिल्यांदाच भिडणार प्रभास

मुंबई टाइम्स टीम

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ या सिनेमांमध्ये चांगलीच टक्कर बघायला मिळाली. आता हा ‘आमने सामने’चा खेळ या आठवड्यातही बघायला मिळणार आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही सिनेमे या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. या दोन्ही सिनेमांची चांगलीच चर्चा असून शाहरुख आणि प्रभास यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. त्यातच दोन्ही सिनेमांना मिळणाऱ्या स्क्रीन्सवरूनदेखील निर्मिती संस्था आणि वितरकांमध्ये स्पर्धा बघायला मिळतेय.

शाहरुखचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानं उत्तरेकडील राज्यांमध्ये त्याच्या ‘डंकी’ सिनेमाला अधिक स्क्रीन्स देण्यात आल्या असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांत या सिनेमाला ४० टक्के शोज देण्यात आले असून ‘सालार’ला फक्त ३० टक्के शोज देण्यात आले आहेत. तर ‘अॅक्वामॅन २’ हॉलिवूड सिनेमाला १२ टक्के शोज दिले गेले असून उर्वरित १० टक्के शोज ‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’साठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये उलट चित्र आहे. तिथे निम्म्याहून अधिक शोज ‘सालार’चे असणार आहेत. मात्र या सिनेमाच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये प्रभास प्रत्यक्ष सहभागी नसल्यानं चाहते काहीसे नाराजदेखील आहेत. दोन्ही चित्रपटांचे विषय, बाज वेगवेगळे आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गही वेगळा असला तरी हे दोन्ही सिनेमे आमने सामने आल्यानं त्यांच्या कमाईवर नक्कीच परिणाम होऊ शकतो असं जाणकार वितरक सांगतात.

परदेशातही टक्कर

सिनेमागृहांच्या स्क्रीन्ससाठी ‘डंकी’ आणि ‘सालार’मधली रस्सीखेच केवळ भारतापुरतं मर्यादित नाही. तर परदेशातदेखील ही टक्कर बघायला मिळतेय. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, गल्फ, युरोप आदी ठिकाणी सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगकडे लक्ष

‘डंकी’ आणि ‘सालार’ या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चढाओढ दिसतेय हे अॅडव्हान्स बुकिंगमुळे दिसून येतंय.

प्राथमिक ट्रेंडनुसार ‘डंकी’ या सिनेमानं सोमवार सकाळपर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ४ कोटी ७१ लाख इतकी कमाई केली आहे. या सिनेमाची आतापर्यंत १ लाख ५२ हजार ३६ इतकी तिकिटं बुक झाली आहेत. तर ‘सालार’ या सिनेमानं सोमवार सकाळपर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ३ कोटी ८६ लाख इतकी कमाई केली आहे. ‘सालार’ची १ लाख ५९ हजार ८९७ इतकी तिकिटं विकली गेली आहे. ‘सालार’ची तिकीटं ‘डंकी’च्या तुलनेत जास्त विकली गेली असली तरी ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन’मध्ये शाहरुख प्रभासला मागे टाकताना दिसतोय. हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोणता सिनेमा जास्त कमाई करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

कलाकारांची तगडी फळी

‘डंकी’चं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. या सिनेमात शाहरुखसोबत तापसी पन्नू, बोमन इरानी आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘सालार’ या चित्रपटात प्रभाससोबत पृथ्वीराज, श्रुती हासन, जगपती बाबू, टिन्नू आनंद, ईश्‍वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘केजीएफ’ फेम प्रशांत नील यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सोमवार सकाळपर्यंतची तिकीटविक्री…

डंकी – ४.७१ कोटी रु. – १,५२,०३६ तिकीटं

सालार – ३. ८६ कोटी रु. – १,५९,८९७ तिकीटं

दाक्षिणात्य राज्यांत ‘सालार’कडे कल

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सालार’ला तेलुगू व्हर्जनसाठी सर्वाधिक बुकिंग मिळाले आहेत. या भाषेतील ४६ हजारांहून अधिक तिकीटविक्री झाली असून १ कोटी ७ लाख रुपयांची कमाई झाली आहे. तर मल्याळीसाठी २३ हजारांपेक्षा जास्त तिकीटविक्री (कमाई ३४ लाखांपेक्षा अधिक) आणि तमिळसाठी दीड हजारांपेक्षा जास्त तिकीटं (२ लाखांहून अधिक कमाई) विकली गेली आहेत. तसंच कन्नड व्हर्जनसाठी १३५ तिकीटांची विक्री (२८ हजारांपेक्षा जास्त कमाई) तर हिंदीसाठी दीड हजारांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री करत ३ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Read Entertainment News And Marathi News

किंग खान ‘डंकी’ चित्रपटाच्या मेगा प्रमोशनसाठी दुबईकडे रवाना

Source link

dunki advance bookingsalar advance bookingshah rukh khan vs prabhasप्रभासशाहरुख खान
Comments (0)
Add Comment