फेब्रुवारी महिन्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारी करता यावी म्हणून इच्छुकांनी उमेदवार निश्चितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा वगळता इतर सर्व खासदार हे महायुतीचे आहेत. त्यामध्ये भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदार संघातील खासदार शिंदे गटाचे आहेत. महायुतीत जातानाच उमेदवारीचा शब्द दिल्याचा प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोघांचा दावा आहे. सारे काही अलबेल नसल्याचा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा नेत्यांमध्ये आहे. यामुळेच भाजपकडून पर्याय शोधला जात आहे. यातून दोन्ही खासदारांची अस्वस्थता वाढली आहे.
सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये दोन गट आहेत. खासदार संजय पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून एक गट कार्यरत आहे. यातून पृथ्वीराज देशमुख व पै. चंद्रहार पाटील, गोपीचंद पडळकर यांची नावे पुढे केली जात आहेत. यामुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सातारा येथून मागील वेळी पराभव झाल्याने उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरण्याची इच्छा आहे. पण ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उदयनराजेंचा हक्क डावलला जाण्याची चिन्हे आहेत.
सोलापूरातून विजयी झालेले खासदार जयसिद्देश्वर स्वामीजी यांची कारकिर्द फारशी प्रभावी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तेथे उमेदवार बदलण्याच्या जोरदार हालचाली भाजपच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या पाच खासदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार मिळेल याची शंभर टक्के खात्रीच वाटत नसल्याचे दिसते. यातून त्यांची अस्वस्थता वाढत आहे. यामुळे लवकरात लवकर जागा वाटप आणि उमेदवारीची घोषणा व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
मतदार संघ व पर्यायी चर्चेतील उमेदवार
कोल्हापूर : हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, शौमिका महाडिक, राजेश क्षीरसागर, संग्राम कुपेकर
हातकणंगले : प्रकाश आवाडे, राहूल आवाडे, सुरेश हाळवणकर, विनय कोरे, सदाभाऊ खोत
सांगली : पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, पै. चंद्रहार पाटील, दिपक शिंदे
सोलापूर : अमर साबळे, राम सातपुते
सातारा : रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, नितीन पाटील, पुरूषोत्तम जाधव, नरेंद्र पाटील
Read Latest Maharashtra News And Marathi News