ट्विनिंग प्रोग्रामनुसार चार सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या एका सत्राचे क्रेडिट हस्तांतरण दोन्ही उभयातांमध्ये करता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने ट्विनिंग प्रोग्रामसाठी टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. वैश्विक ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्परसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि संशोधकांच्या देवाणघेवाणीमुळे एक वेगळा जागतिक नागरिक विकसित करण्यात मदत होणार असल्याचा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
आजमितीस मुंबई विद्यापीठ हे ८ विद्यापीठ मिळून तयार झालेल्या संघाचे पूर्णवेळ भागीदार आहे. ज्यामध्ये बोलोज्ञा, स्ट्रासबर्ग, म्युलस, थेस्सलोनिकी, लिसबन, सेनेगाल आणि तीब्लीसी यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या अंतर्गत पूर्णवेळ एम.ए. (युरोपियन साहित्य आणि संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय बहुपर्यायी पदव्युत्तर अभ्यासक्रमः मास्टर सीएलई) राबवला जातो. त्याचबरोबर स्पॅनिश भाषा आणि संस्कृती, इटालियन भाषा आणि संस्कृती आणि पाश्चिमात्य कला आणि रसग्रहण यामध्ये प्रमाणपत्र आणि पदविका अर्धवेळ अभ्यासक्रम राबविले जात असल्याचे सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या संचालिका प्रा. विद्या वेंकटेशन यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील, सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या संचालिका प्रा. विद्या वेंकटेशन यांच्यासह बोलोज्ञा विद्यापीठातून प्रा. ब्रुना कोंकोनी आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संचालिका प्रा. राफाएल्ला काम्पानेर आदी उपस्थित होते.