‘झिम्मा २’ची भुरळ केवळ प्रेक्षकांना नसून, सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. सात जणींची ही सहल प्रेक्षकांना आवडत असतानाच चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहेत. बायका थिएटरमध्ये गाण्यांवर ठेका धरत आहेत. विनोदावर, संवादांवर टाळ्या, शिट्या वाजवत आहेत. एकंदरच सिनेरसिक हा चित्रपट एंजॉय करत आहेत. बऱ्याच थिएटरमध्ये सगळे शो हाउसफुल होत असून, मोठ्या ग्रुपनं प्रेक्षक चित्रपट पाहायला येत आहेत. आतापर्यंतचा बॉक्स ऑफिसचा आकडा पाहता ‘झिम्मा २’ हा लवकरच ‘झिम्मा’चा रेकॉर्ड ब्रेक करणार असं दिसतंय. सिनेमाने सात दिवसांत जळपास ७.७१ कोटींची कमाई केली आहे.
प्रेक्षकांसह आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, आदेश बांदेकर, अमेय वाघ, अकुश चौधरी, अभिजीत खांडकेकर, आनंद इंगळे, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव अशा अनेक कलाकारांनी ‘झिम्मा २’चं भरभरून कौतुक केलं आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘आमचा चित्रपट आता आमचा राहिला नसून, तो प्रेक्षकांचा झाला आहे. पहिल्या आठवड्यात मिळालेला प्रतिसाद पाहता आणि दुसऱ्या आठवड्याची सुरुवात पाहता, हा आठवडाही प्रचंट यशस्वी होईल, अशी खात्री आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत असून, तिथल्या प्रेक्षकांचा थेट प्रतिसाद घेत आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रियाही खूप भारी आहेत. ‘झिम्मा २’ हा पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्या प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. या चित्रपटाला केवळ मैत्रिणीच नाही, तर मित्रही येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. इंडस्ट्रीतील माझ्या मित्रमैत्रिणींही मला फोन करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रेक्षकांसह समीक्षकांनाही ‘झिम्मा २’ आवडतोय हे समाधान देणारं आहे. थिएटर दौऱ्यात अनेक ठिकाणी आम्हाला ‘हाउसफुल’चे बोर्ड झळकताना दिसत आहेत. पुढील आठवड्याचं अॅडव्हान्स बुकिंगही ‘हाउसफुल’ झाल्याचं दिसतंय. खूप मस्त फिलिंग आहे. या प्रेमासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.’
‘कलर यल्लो प्रॉडक्शन’च्या सहकार्यानं जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल. राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.