बॉक्स ऑफिसवर महिलाराज! या मराठी चित्रपटांनी केली बक्कळ कमाई; हिंदी सिनेमांनाही दिली टक्कर

मुंबई टाइम्स टीम

चित्रपटांमध्ये अलीकडे वैविध्यपूर्ण विषय पाहायला मिळाले. त्यातही स्त्रीप्रधान सिनेमे बाजी मारत होते. यावर्षी महिलाकेंद्री विषय असलेल्या सिनेमांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांचं आयुष्य, नातेसंबंध, त्यांची मतं, भूमिका, भावविश्व, त्यांच्यातली मैत्री, त्यांचं म्हणणं असं सारं काही त्या सिनेमांमधून दाखवलं गेलं. या सिनेमांनी कधी हसवलं, कधी रडवलं, तर कधी विचार करायला लावलं. अनेकींना बळ दिलं तर स्वतःसाठी उभं राहण्याचा आत्मविश्वासही दिला. सिनेमांचे विषय संवेदनशील असले तरी त्यांनी मनोरंजनही तितकंच केलं. अनेक जण सिनेमातील व्यक्तिरेखांच्या आयुष्याशी जोडू पाहत होते; आणि म्हणूनच हे चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचे ठरले. पडद्यावरील याच ‘महिलाराज’ सिनेमांविषयी…

* कुशल आणि गुणवान स्त्री व्यक्तिरेखांनी मराठी सिनेमाचा पडदा व्यापून टाकला आहे. महिलांचा संघर्ष, त्याग, त्यांच्या जिद्दीचा प्रवास सिनेमाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर मांडला जातोय. आता अभिनेत्रीदेखील अधिकाधिक स्त्रीप्रधान सिनेमांचा भाग होण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

* दिग्दर्शक आणि निर्माते वेगवेगळ्या विषयांवरील स्त्रीभिमुख कथानकांवर सिनेमे करण्यासाठी उत्सुक आहेत.

* ‘ती’ची गोष्ट जाणून घ्यायची आहे

चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत स्त्री व्यक्तिरेखा असणं ही गोष्ट सिनेसृष्टीला नवा प्रेक्षकवर्ग मिळवून देत आहे. तसंच ही बाब सामाजिकदृष्ट्या सिनेविश्वाला एक नवा आयाम देणारी आहे. यानिमित्तानं सिनेमांच्या कथानकाच्या कक्षा रुंदावत आहेत. हा बदल प्रामुख्यानं गेल्या दोनेक वर्षांत दिसतोय. महिलाप्रधान सिनेमांना भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांना ‘ती’ची गोष्टसुद्धा समजून आणि जाणून घ्यायची आहे. या सर्व कथानकांशी प्रेक्षकांचं एक भावनिक नातं तयार होतंय.
– गिरीश जौहर, सिनेमा ट्रेंड अॅनालिस्ट

* महिला केंद्री मराठी सिनेमे

सरला एक कोटी
मुख्य अभिनेत्री : ईशा केसकर

दिग्दर्शक : नितीन सुपेकर

वैशिष्ट्य : आजच्या समकालीन परिस्थितीत किंबहुना आधुनिक लेखकाच्या नजरेतून स्त्रीची होणारी कुचंबणा दिग्दर्शक नितीन सुपेकर यानं ‘सरला एक कोटी’ सिनेमातून मांडली आहे. सत्य घटनेवरून प्रेरित असलेला हा सिनेमा त्या प्रत्येक ‘कौरव’वृत्तीच्या पुरुषांना आणि आपल्या पत्नीला सारीपाटाच्या डावावर जुंपणाऱ्या पांडवांना आरसा दाखवणारा ठरला.

फुलराणी
मुख्य अभिनेत्री : प्रियदर्शनी इंदलकर

दिग्दर्शक : विश्वास जोशी

वैशिष्ट्य : ही गोष्ट एका सर्वसामान्य, निरागस, महत्त्वाकांक्षी मुलीची आहे. तिच्यासमोर असलेला विक्रम राजाध्यक्ष हादेखील महत्त्वाकांक्षी आहे. पण तो अहंकारी आहे. या दोघांमधील द्वंद्वानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. सिनेमातील स्वप्न बघणाऱ्या तरुणीच्या आयुष्याशी अनेकजणी जोडल्या गेल्या.

बटरफ्लाय
मुख्य अभिनेत्री : मधुरा वेलणकर

दिग्दर्शिका : मीरा वेलणकर

वैशिष्ट्य : ‘होम मेकर’ अर्थात गृहिणी घरातल्या सगळ्यांसाठी, नातेवाईंकासाठी सगळं करत असतात. पण त्यांना स्वतःसाठी काही करायचं असेल तर शंभर वेळा विचार करावा लागतो. अशाच एका ‘होम मेकर’चं आयुष्य ‘बटरफ्लाय’मध्ये दाखवलंय. तिची स्वप्नं, आवड, छंद याचा पाठपुरावा करताना तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. ही गोष्ट प्रत्येकीला आपली वाटल्यामुळे महिला प्रेक्षक त्याच्याशी जोडल्या गेल्या.

बाईपण भारी देवा
मुख्य अभिनेत्री : रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब

दिग्दर्शक : केदार शिंदे

वैशिष्ट्य : वेगवेगळ्या वयोगटातील सख्ख्या बहीणींची ही गोष्ट प्रेक्षकांना त्यांची वाटली. महिला प्रेक्षक तर प्रत्येक व्यक्तिरेखेत स्वतःला बघत होत्या. मंगळागौरसारखा पारंपरिक खेळ मध्यवर्ती ठेवून बांधलेली सिनेमाची कथा लोकप्रिय ठरली.

शॉर्ट अँड स्वीट :

मुख्य अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी

दिग्दर्शक : गणेश कदम

वैशिष्ट्य : वडील आणि मुलाचं नातं कितीही मैत्रीचं असलं तरी अनेकदा आई त्यांच्यातील दुवा असण्याचं काम करते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नातं अधिक बहरू शकतं. ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’मध्ये अशाच नात्यावर भाष्य करण्यात आल्यामुळे ती कथा लक्षवेधी ठरली.

श्यामची आई
मुख्य अभिनेत्री : गौरी देशपांडे

दिग्दर्शक : सुजय डहाके

वैशिष्ट्य : साने गुरुजींची ‘श्यामची आई’ ही कादंबरी लोकप्रिय तर आहेच; शिवाय संस्कारांची शिदोरी म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. याच कादंबरीवर आधारित या सिनेमानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रेम, भक्ती, कृतज्ञता, त्याग आणि सहिष्णुतेचा मर्म प्रेक्षकांना सिनेमात पदोपदी दिसतो.

झिम्मा २
मुख्य अभिनेत्री : सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे

दिग्दर्शक : हेमंत ढोमे

वैशिष्ट्य : मैत्रीला वय नसतं. हाच धागा लेखिका इरावती कर्णिक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सिनेमात मांडला आहे. वेगवेगळ्या वयोगटातल्या, स्वभावाच्या सात जणी एकत्र येतात आणि एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होऊन जातात. यांच्या मैत्रीची कथा दाखवतानाच त्यातील प्रत्येकीच्या आयुष्याचे वेगवेगळे कंगोरे सिनेमात दिसतात. त्यांच्या मैत्रीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडतोय.

* महिलाकेंद्री हिंदी सिनेमे
महिलाराज सिनेमांची लाट हिंदी चित्रपटांमध्येही दिसली. काही आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी ही वाट धरत उत्तम सिनेमे दिले. तर काहींनी त्यांच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये स्त्रीप्रधान सिनेमांना पसंती दर्शवत दमदार अभिनय केला.

मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – राणी मुखर्जी

अकेली – नुसरत भरुचा

सुखी – शिल्पा शेट्टी

थँक यू फॉर कमिंग – भूमी पेडणेकर, शेहनाज गिल

तरला – हुमा कुरेशी

तेजस – कंगना रणोट

छत्रीवाली – रकुल प्रीत सिंग

लॉस्ट – यामी गौतम

मिसेस अंडरकव्हर – राधिका आपटे

द केरला स्टोरी – अदा शर्मा

थ्री ऑफ अस – शेफाली शहा

Source link

baipan bhaari devajhimma 2 movie box office collectionmarathi movie box office collectionmarathi women centric movieswomen centric movieswomen centric movies in marathiझिम्मा २बाईपण भारी देवा
Comments (0)
Add Comment