सराफी पेढीत दृश्यम स्टाईल चोरी; मित्राला दारु पाजून गायब केल्या चाव्या, नंतर जे घडलं ते भयंकर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : रविवार पेठेतील एका सराफी पेढीचे कुलूप उघडून तिजोरीतील तीन कोटी ३२ लाख रुपये किमतीचे पाच किलो सोने आणि दहा लाख ९३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

संबंधित सराफी पेढीच्या व्यवस्थापकाच्या मित्राने ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री त्याला मोठ्या प्रमाणावर दारू पाजली आणि पेढीच्या चाव्या चोरून मध्यरात्री चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची रविवार पेठेत सराफी पेढी आहे. दागिने तयार करण्यासाठी विविध ठिकाणचे सराफ त्यांच्याकडे सोने देतात. तक्रारदाराकडील कामगार ते दागिने बनवून देत असत. हा सर्व व्यवहार पाहण्यासाठी तक्रारदाराने एका व्यवस्थापकाची नेमणूक केली होती. तक्रारदार घटनेच्या दिवशी कामानिमित्त त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते. त्यामुळे व्यवस्थापकाने नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर तो त्याच्या राहत्या घरी गेला.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यवस्थापकाच्या मित्रांनी पार्टीचे नियोजन केले. व्यवस्थापकाच्या ‘रूम पार्टनर’नेही त्याला खूप दारू पाजली. त्याचा मित्र बऱ्याच काळापासून त्याच्यासोबत राहत होता. तो दुसरीकडे काम करतो. मात्र, व्यवस्थापकाच्या बोलण्यातून त्याला संबंधित सराफी पेढीविषयी माहिती होती. ३१ डिसेंबरला व्यवस्थापकाने जास्त दारू प्यायली होती. व्यवस्थापक व त्याचे मित्र घरी येऊन झोपले. व्यवस्थापक झोपताच त्याच्या ‘रूम पार्टनर’ने व्यवस्थापकाकडील सराफी पेढीच्या चाव्या काढून घेतल्या. त्याने सराफी पेढी गाठून रात्रीच सराफी पेढी उघडून तिजोरीतील तीन कोटी ३२ लाख रुपयांचे सोने आणि १० लाख ९३ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला; तसेच घरी परत येऊन चाव्या पुन्हा होत्या त्या जागी ठेवल्या. तो सकाळी निघून गेला.

…अन् चोरी उघड झाली

एक जानेवारीला सकाळी उठून व्यवस्थापक नेहमीप्रमाणे सराफी पेढीत गेला. त्या वेळी चोरीचा प्रकार समोर आला. व्यवस्थापकाने तक्रारदाराला घटनेची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी फरासखाना पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली.
चिरीमिरी टेकवा अन् सिलिंडर मिळवा; पुण्यात अनधिकृत गॅसच्या विक्रीचा पर्दाफाश
यामुळे आला संशय

– सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीचा प्रकार कैद झाला आहे. यात एक जण सराफी पेढीत घुसून चोरी करीत असल्याचे दिसून येते. मात्र, डोक्यावर टी-शर्टची ‘कॅप’ (हुडी) असल्याने त्याचा चेहरा दिसत नाही.
– पोलिसांनी या व्हिडिओचे आणि घटनेचे विश्लेषण केले. त्यात शटरचे किंवा तिजोरीचे कुलूप उघडताना तोडफोड केली नसल्याचे दिसले. त्यामुळे बनावट किल्लीच्या साह्यानेच कुलूप उघडले असणार हे स्पष्ट होते.
– चोरट्याचा पेढीतील वावर पाहता, त्याला पेढीविषयी चांगली माहिती असणार, असा संशय आला. त्यातून चोरी ओळखीतीलच व्यक्तीने केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
– त्यातून तपासाला दिशा मिळाली असून, पोलिस चोराच्या मागावर आहेत.

Source link

Pune crime newsPune newsravivar pethsangali newsआमदार रवींद्र धंगेकरथर्टी फर्स्ट पार्टीथर्टी फर्स्ट सेलिब्रेशनरविवार पेठ सराफी पेढी
Comments (0)
Add Comment