महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी कॉफी शॉपच्या नावाखाली खोल्या उपलब्ध करून देणाऱ्या दोन सेंटरवर गेल्या महिन्यात कारवाई करण्यात आली होती. याच पद्धतीच्या आणखीन तीन शॉपवर पोलिसांनी छापा घालून तेथील गैरप्रकार उद्ध्वस्त केले आहेत.
पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कॅफे हिडन कॉफीशॉपचा मालक गजेंद्र सुनील सुपेकर (वय २८, रा. गांधी चौक), ‘बडीज’चा मालक मेघराज दत्तात्रय चव्हाण (वय २९, राय भाग्यनगर) आणि द शेलेक्सचा मालक अमोल दुर्गादास जाधव (वय २७, रा. भाग्यनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘हिडन’मध्ये चार युगुले, ‘बडीज’मध्ये दोन आणि ‘शेलेक्स’मध्ये तीन युगुले आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. या तिन्ही कारवाईत आढळून आलेले सर्व प्रेमीयुगल १७ ते २१ वयोगटातील आहेत.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिनबापू सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह मानवी तस्करी विरोधी पथकाच्या उपनिरीक्षक प्रियंका तुपे, उपनिरीक्षक मंगल सुडके, महिला अंमलदार शोभा कदम, संगीता चव्हाण, आरती साबळे, प्रियंका बोरकर, भारत ढाकणे, प्रदीप करतारे, चालक संजय कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.
येथे घातले छापे
– कदीम जालना हद्दीतील गांधीचमन, महिला व बाल रुग्णालयासमोर हिडन फूड्स
– गांधी पुतळ्यासमोर बडीज् कॉफी कॅफे
– सिंदखेडराजा रोडवरील दत्ताश्रमासमोर द शेलेक्स कॅफे
कॉफी शॉपच्या नावाखाली गोरखधंदा
– या तिन्ही कॉफी शॉपमध्ये पंधरा प्रेमी युगुलांना एकांतात अश्लील चाळे करण्यासाठी कंपार्टमेंट बेडरूम पुरवल्या जात
– व्यवसायाव्यतिरिक्त लाखो रुपयांची वरकमाई या गोरखधंद्यातून केली जात होती
– प्रत्येक युगुलाकडून एका तासासाठी खोली देण्यासाठी एक हजार रुपये आकारले जात