किंग खानच्या ‘जवान’चे वर्ल्डवाइड कलेक्शन
प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या शनिवारी ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. दुसऱ्या शनिवारी जवानने ३१.५० कोटी रुपयांची कमाई केली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार ‘जवान’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या शनिवारपर्यंत ४४०.४८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर परदेशी बॉक्स ऑफिसवर कमाई २३३ कोटींहून अधिक आहे. यामुळे जगभरातील एकूण कलेक्शन ७२५ कोटींपेक्षा अधिक झाल्याचा अंदाज आहे.
जवान ७ सप्टेंबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम केला. पहिल्याच दिवशी जवानने जगभरात १२९.६ कोटी रुपयांची कमाई केली आणि देशभरातील पहिल्या दिवसाची कमाई ७४.५ कोटी रुपये होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चार दिवस चांगली कमाई सुरू ठेवली होती, मात्र पाचव्या दिवसापासून कमाई झपाट्याने घसरली. मात्र आता पुन्हा दहाव्या दिवसापर्यंत ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर जम बसवायला सुरुवात केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी म्हणजेच १०व्या दिवशी सर्व भाषांतून एकूण ३१.५० कोटींची कमाई केल्याने सिनेमाच्या कमाईत सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा अद्याप प्राथमिक अंदाजानुसारच आहे. दुपारपर्यंत नवीन आकडेवारी अपेक्षित आहे.
‘पठाण’ला मागे टाकणार ‘जवान’
‘जवान’ बॉक्स ऑफिसवर ज्या वेगाने कमाई करत आहे, त्यानुसार शाहरुखचा हा सिनेमा त्याच्या आधीचा सिनेमा ‘पठाण’च्या जगभरातील कलेक्शनला मागे टाकण्याची शक्यता आहे. ‘पठाण’ने जगभरात १५०० कोटींची कमाई केली होती. ‘जवान’ने अवघ्या ९ दिवसांत जगभरात ७०० कोटीहून अधिकची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘जवान’ने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत ‘पठाण’ला मागे टाकले तर आश्चर्य वाटायला नको.