भुदरगड तालुक्यातील मेघोली या गावात मेघोली लघू पाटबंधारे तलाव आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेघोली तलाव फुटल्याने शेतात, शेतातील घरे, गोठ्यात पाणी घुसले. प्रकल्प फुटल्याची माहिती कळताच रात्रीत झोपत असलेले नागरिक उठून ओढ्याच्या दिशेने धावले. अनेकांनी बचावकार्यासही सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने जनावरे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून ग्रामस्थ धावले. नवले येथील धनाजी मोहिते यांच्या गोठ्यात पाणी घुसले. ते स्वत: त्यांची पत्नी, जिजाबाई, मुलगा, नातू गोठ्यात गेले. जनावरांची सुटका करत असताना सर्वजण पाण्यात वाहून गेले. धनाजी मोहिते, त्यांचा मुलगा आणि नातू झाडाला धरून बसल्याने ते वाचले. पण त्यांच्या पत्नी जिजाबाई वाहून गेल्याचे कळते. तलाव फुटल्याने मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरुळ या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पण त्यांच्या गोठ्यातील चार जनावरे मृत्यूमुखी पडल्याने मोठे नुकसान झाले.
गावात असलेली अनेक दुचाकी वाहनंही ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. तलावाचं पाणी ओढे-नाले यामध्ये आल्यानं ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला. पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतात घुसलं. यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पाणी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांनी सकाळी मोठी गर्दी केली.