कोण आहे रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला आरोपी होत्या. त्याचीही चौकशी करण्यात आली. मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
महाविकास आघाडी सरकारने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कथित फोन टॅपिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू केली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप झाल्याचे सांगितले होते. राज्यात सरकार बदलल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्याविरोधातील तपास बंद करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधातील याचिका फेटाळली होती. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. पोलीस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात.