थंडी पळाली, शुक्रवारी पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

डिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली थंडी शहराच्या वातावरणातून गायब झाली आहे. गेल्या दोन दिवसांत रात्री व पहाटेच्या सुमारास थोडीफार थंडीची चाहूल लागत होती. मात्र, आता शुक्रवारी पावसाचा अंदाज असल्याने परत एकदा सर्द वातावरण तयार होण्याची तसेच ढगांमुळे तापमानातही काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा विदर्भात फारशी थंडी जाणवत नसल्याचे चित्र आहे. यंदा एल-निनो व अधूनमधून निर्माण होत असलेल्या वादळांमुळे यंदा थंडीची भट्टी जमली नाही. मध्यंतरी मिग्जॉम वादळाचा फटका नागपूरला बसला होता. शहर व विदर्भात काही ठिकाणी पावसाची हजेरीही लागली होती. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू थंडीला सुरुवात झाली होती. सध्या उत्तरेकडे चांगली थंडी पडत असून ही थंडी मध्य भारतातपर्यंत पोहोचेल अशी आशा होती. मात्र, अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

विदर्भ व नागपुरातही शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. शनिवारपासून पावसाचा अंदाज नसला तरीसुद्धा ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळे तापमान घसरून थंडी वाढण्याची शक्यता नाही. प्रादेशिक हवामान खात्यानुसार, विदर्भात १० जानेवारीपर्यंत किमान तापमान हे सरासरी किमानपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच ४ ते १० जानेवारी या काळात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची अपेक्षा असल्याने या काळात पावसाचीही शक्यताही वर्तविण्यात आली होती. ती खरी ठरत असल्याचे दिसून येते आहे.

Source link

Nagpur newsnagpur weather updaterain chance in nagpurनागपूर बातम्यानागपूर हवामान
Comments (0)
Add Comment