मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. आंदोलनात राज्यभरातील आंदोलक सहभागी होणार आहेत. अंतरवाली ते मुंबई अंतर पायी पार करण्यात येणार आहे. आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो या वाहनांमध्ये गरजेचे सामान घेऊन आंदोलक मुंबईला निघणार आहेत.
मराठा आंदोलनाची पूर्वतयारी राज्यभरातील संयोजक, कार्यकर्ते करीत आहेत. पण, जरांगे यांची भिस्त गोदावरी पट्ट्यातील १२३ गावांवर आहे. त्यामुळे जरांगे यांनी ४ ते ८ जानेवारी दरम्यान १२३ गावांचा दौरा सुरू केला आहे. गावोगावी भेटीगाठी घेत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जरांगे आवाहन करीत आहेत. आपेगाव (ता. अंबड) येथे गुरुवारी विज्ञानेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जरांगे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. बळेगाव, साष्ट पिंपळगाव, डोमलगाव, गंधारी, शहागड, वाळकेश्वर, नागझरी, कुरण, पाथरवाला, हिंगणगाव, गोंदी, काठोळा, हसनपूर आणि साडेगाव या गावांना पहिल्या दिवशी भेट दिली. मराठा आरक्षणासाठी ही अटीतटीची लढाई आहे. भावी पिढ्यांचे कल्याण करण्यासाठी आपल्याला मुंबईला जावे लागेल, असे आवाहन जरांगे यांनी ग्रामस्थांना केले. गावातून मुंबईला येणाऱ्या तरुण आणि ज्येष्ठांची यादी गावकरी निश्चित करीत आहेत.
जरांगे पाटलांची १२३ गावांना साद
शुक्रवारी दिवसभरात जोगलादेवी, रामसगाव, बाणेगाव, भोगगाव, मुरमा, खालापुरी, तीर्थपुरी, हिवरा, रुई, बेलगाव, कुक्कडगाव, लखमापुरी, सुखापुरी, वडीकाळ्या या गावात जरांगे यांचा दौरा आहे. सोमवार, आठ जानेवारीपर्यंत जरांगे अंबड, घनसावंगी, माजलगाव, गेवराई आणि पैठण तालुक्यातील गोदापट्ट्यातील गावांचा दौरा पूर्ण करणार आहेत. या गावांच्या पाठबळावर आंदोलन व्यापक झाले आहे. राज्यभरात गाजलेल्या जाहीर सभेसाठी याच गावांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे जरांगे यांनी हक्काच्या गावांना पुन्हा साद घातली आहे. ‘या गाठीभेटी दौऱ्याचा अंतरवाली येथे समारोप होईल. या दौऱ्यातून जरांगे लाखो लोकांना एकत्र आणत आहेत’, असे निकटवर्तीय पदाधिकाऱ्याने सांगितले. गावोगावी दवंडी देऊन जरांगे यांच्या भेटीगाठीच्या वेळापत्रकाची माहिती दिली जात आहे. शिवाय सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
दीड महिन्यांचे सामान सोबत
गोदापट्ट्यातील १२३ गावांनी मुंबईच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. बळेगाव येथून ४७ ट्रॅक्टर जाणार आहे, असे स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले. प्रत्येक गावाचे २५ पेक्षा अधिक ट्रॅक्टर, ट्रक असतील. किमान दीड महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि इतर साहित्य सोबत घेणार आहेत. वाहनातच मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे त्याच्यावर छत घालण्याची तयारी गावकरी करीत आहेत. मुंबईला पोहचेपर्यंत आंदोलनातील सहभागींची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अधिक स्वयंसेवकांची गरज भासणार असल्याने बैठका घेऊन सूचना करण्यात येत आहेत.