हायलाइट्स:
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जाम
- एकावेळी मोठी वाहने जाऊ शकत नाहीत
- कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास
चिपळूण : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण बहादुरशेख नाका ट्रॅफिक जाम झाले आहे. येथील जुन्या पुलावरून मोठी अवजड वाहने एकावेळी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अवजड मालवाहू वाहनांमुळे ही वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, ते गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याजवळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्डे, पावसामुळे झालेला चिखल व बहादूर शेख नाक्यावर जीर्ण झालेला ब्रिटीशकालीन पूल अनेकदा होत असलेले ट्रॅफिक जाम यामधूनच मार्ग काढत जावे लागणार आहे.
यावेळी पावसाची रिमझिम सुरू असतानाही ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम एक दोन ट्रॅफिक पोलीसांकडून सुरू होते. पावसामुळे आधीच रस्त्यांची चाळण झाली आहे. अशात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे.