मोठी बातमी : काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे मागवली

नागपूर : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे सूत्र अद्याप अस्पष्ट असताना प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत मागवून मित्रपक्षांना बुचकळ्यात टाकले आहे.

इंडिया आघाडी वा महाविकास आघाडीतील जागांची चाचपणी चालली आहे. कोणत्याही पक्षाने जागा निश्चित केलेल्या नाहीत. राज्यातील ४८ जागांचा विचार केल्यास तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे मुख्यमंत्री व विधिमंडळ नेत्यांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. प्रभारी रमेश चेन्नीथला काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. काँग्रेसने सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. बैठकीत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

दिल्लीतील बैठक आटोपताच सर्व जिल्हाध्यक्षांकडून राज्यातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत पाठवण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्याकडे संघटन व प्रशासनाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी लगेच सायंकाळी सर्व जिल्हाध्यक्षांकडून नावे मागवली.

गेल्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकमेव जागेवर यश मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळी फूट पडलेली नव्हती. आता स्थिती बदलली. दोन्ही पक्षाचे दोन गट झाल्याने काँग्रेसला अधिकाधिक जागा अपेक्षित आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते समान जागांच्या फॉर्म्युल्याचा बाजूने असल्याचे समजते.

मध्यंतरी प्रत्येकी १६ जागांच्या फॉर्म्युल्याची चर्चा होती. काँग्रेस नेत्यांनी त्याचा इन्कार केला. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे चित्र निवडणूक जाहीर होईपर्यंत स्पष्ट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निम्म्याहून अधिक जागांवर तोडगा निघेल, मात्र दोन वा तिन्ही पक्षाचा दावा असणाऱ्या जागांचा तिढा अंतिम टप्प्यात सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुकांची यादी मागवल्यानंतर शिवेसना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोणती चाल खेळतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Source link

48 lok sabha constituencyCongresscongress interested candidatesloksabha electionloksabha election 2024काँग्रेसकाँग्रेस लोकसभा निवडणूककाँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली
Comments (0)
Add Comment