रोहित पवार अजून लहान, पहिल्या टर्मचे आमदार, मी त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही: आव्हाड

शिर्डी: श्रीराम हा बहुजन होता, क्षत्रिय होता, १४ वर्षे वनवासात असताना तो शिकार करुन खायचा, असे वक्तव्य करुन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाद ओढावून घेतला होता. या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला होता. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. रोहित पवार काय बोलतात त्याकडे मी फार लक्ष देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं आहे. ते अजून लहान आहेत, त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. ते गुरुवारी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कुठल्या देवाला मांसाहार प्रिय? कुठे मिळतो सामिष प्रसाद? राम कदम यांची जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिले. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण आजकाल अभ्यासाला नाही भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याची चर्चा होती. याविषयी विचारणा केली असता आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार नेहमी सांगायचे, सामाजिक आशय मांडत असताना त्याला पक्ष कधीही जबाबदार नसतो. मी जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात उतरलो होतो तेव्हा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला पुरंदरे यांची घरी जाऊन माफी मागण्यास सांगितले होते. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. तेव्हा मी शरद पवार यांना फोन करुन त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले की, तुझा इतिहासाचा अभ्यास आहे. तुला जे योग्य वाटतं ते तू बोल. यामध्ये पक्षाचं काहीही देणंघेणं नाही. पक्ष कोणाचीही सामाजिक भूमिका ठरवत नाही. त्यामुळे मी कुठलीही लढाई एकट्यानेच लढतो. पुरंदरे प्रकरण मी एकट्याने तीन महिने लावून धरले. त्यामुळे शनिवारवाड्यात होणारा सोहळा राजभवनावर बंदिस्त सभागृहात घ्यावा लागला होता. लढाई करताना माझ्यासोबत कितीजण आहेत, हे बघत राहिलं तर लढताच येणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. यावर आता रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

श्रीरामांविषयी वक्तव्य अभ्यासपूर्णच, पण भावना दुखावल्यास खेद, जितेंद्र आव्हाडांनी पुरावे दाखवले

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

राम हा आपला बहुजनांचा, शिकार करून खाणारा, राम शाकाहारी नव्हता | Jitendra Awhad

Source link

ayodhya ram mandirJitendra Awhadlord ramMaharashtra politicsnon vegetarianRohit Pawarजितेंद्र आव्हाडरोहित पवारश्रीराम मांसाहारी
Comments (0)
Add Comment