मालाडमध्ये वास्तव्यास असलेली एक महिला तिच्या मुलासाठी नोकरीच्या शोधात होती. याचदरम्यान तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीने अतुल राठोड नावाच्या एका तरुणाशी तिची ओळख करून दिली. अतुल याने अनेकांना पालिकेत नोकरीला लावल्याचे नियुक्तीपत्र त्यांनी दाखविले. ड वर्गातील नोकरीसाठी प्रत्येकी साडेसहा लाख रुपये खर्च येत असल्याचे त्याने सांगितले. यावर ही महिला तसेच त्यांच्या शेजारी राहणारा आणखी एक तरुण यासाठी पैसे देण्यास तयार झाले. दोघांनी दागिने गहाण ठेवून, क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊन जवळपास बारा लाख रुपये अतुलला दिले. मात्र एका नियुक्ती पत्राव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळाले नाही. उत्तरप्रदेश येथील तरुणाला विदेशात कायमस्वरूपी नोकरी असल्याचे सांगून मुंबईत गोरेगाव येथे बोलाविण्यात आले. ऑस्ट्रेलिया येथे जाण्याचा प्रवासखर्च, व्हिसा फी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून दोन लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले. फेसबुकवर मैत्री झालेल्या विशाल मोहिते नावाच्या व्यक्तीने नोकरीसाठी फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या तरुणाने पोलिसांत तक्रार केली.
माटुंगा आणि मुलुंडमध्ये जेएनपीटीतील नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. परळ येथे राहणाऱ्या तरुणाने संगणक प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र त्याला नोकरी लागत नव्हती. त्याचवेळी जनार्दन पाटकर नावाच्या व्यक्तीने त्याला जेएनपीटीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. यासाठी त्याच्या वडिलांकडून एक लाख दहा हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात नोकरी काही दिली नाही. विलेपार्लेच्या मफतलाल पॉली टेक्निकल कॉलेजातून मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला तरुण नोकरीच्या शोधात होता. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्याचा नोकरीसाठी शोध सुरू होता. राहुल रामटेके नावाच्या व्यक्तीने या तरुणाकडून न्हावा शेवा येथील जेएनपीटीमध्ये नोकरीसाठी नोंदणी फी, प्रोसेसिंग फी आणि इतर कारणे सांगून दोन लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र नोकरीसाठी तगादा लावल्यावर टाळाटाळ केली.