हायलाइट्स:
- विधान परिषदेवरील सदस्य नियुक्तीवरून नवा पेच
- राजू शेट्टी यांच्या नावाला राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची चर्चा
- राजू शेट्टी म्हणाले, आमचं लक्ष निर्णयाकडं
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या नावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टींच्या नावास आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनंच शेट्टींचं नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आज त्यांची भूमिका मांडली. (Raju Shetti On MLC Appointment)
वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार; राज्य सरकारनं झटपट घेतला ‘हा’ निर्णय
ते पत्रकारांशी बोलत होते. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी पवार साहेबांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीनं एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचं पवार साहेबांनी मान्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर स्वाभिमानीनं राष्ट्रवादीला त्या समझोत्याची आठवण करून दिली. जून २०१९ मध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांसोबत माझी बैठक झाली. त्यानंतर विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागांसाठी पाठवलेल्या नावांमध्ये माझं नाव समाविष्ट केलं होतं. तेव्हापासून गेल्या सव्वा वर्षात या विषयावर माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही. मी कुणालाही भेटलेलो नाही. फोन केलेला नाही. माझ्या नावाबाबत आता जी चर्चा सुरू आहे, त्यात आम्हाला अजिबात रस नाही. तो आमच्यासाठी काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे. स्वाभिमानीचा तो अधिकार आहे. माझं निर्णयाकडं लक्ष आहे,’ असं शेट्टी म्हणाले.
Kolhapur : शब्द पाळायचा की नाही, हा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचाय; राजू शेट्टी असं का म्हणाले?
राज्यपालांच्या भूमिकेबाबत विचारलं असता, ‘राज्यपालांना निर्णय घेण्याची सवय नाही. त्यांना आधी निर्णय घेऊ द्या. मग आमदारकी स्वीकारायची की नाही हे मी ठरवेन,’ असंही शेट्टी म्हणाले.
वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार; राज्य सरकारनं झटपट घेतला ‘हा’ निर्णय
राजू शेट्टी यांची संघटना ही राज्यातील महाविकास आघाडीचा भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेट्टी यांनी राज्यातील सरकारविरुद्ध आघाडी उघडली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी आक्रोश मोर्चा काढला होता. आता जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. आपल्याच सरकारविरुद्ध त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.