मुंबईतील वडाळ्यातील जीएसबी गणेश मंडळाने एका विमा कंपनीकडून ३६०.४० कोटी रुपयांचा विमा मिळवला आहे. मंडळाचे उपाध्यक्ष राघवेंद्र भट यांनी सांगितले की, महागणपतीची मूर्ती ६६ किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि ३३६ किलो चांदी व इतर मौल्यवान साहित्याने सजवण्यात आली आहे. त्यामुळेच दागिने आणि गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा करून घेतला आहे. या विम्याच्या रकमेत ३८.४७ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय मंडळात दर्शनासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, स्टॉल कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींचा ३२१ कोटी रुपयांचा विमा समाविष्ट आहे.
गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी गणेशमूर्ती सजवली जाते आणि पाच दिवस अखंडपणे येथे धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गणेश मंडळे दरवर्षी दागिने आणि सेवेत गुंतलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवतात. गणपतीला पहिल्याच दिवशी २५ तोळे सोनं अर्पण झालंय. नैवेद्याचे १२ बाऊल अर्पण केलेत. एक बाऊल ३ किलो वजनाचा आहे. म्हणजे एकूण मिळून ३६ किलो चांदी अर्पण करण्यात आलीय.
मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी सांगितले की, जीएसबी सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे ६९ वे वर्ष आहे. शहरातील हे एकमेव गणेश मंडळ आहे जेथे चोवीस तास विधी केले जातात. पाच दिवस दर्शनासाठी मोठा जनसमुदाय येतो, त्यांच्या सुरक्षेसाठी मंडळामध्ये हाय डेन्सिटी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दररोज ५० हजार भाविकांसाठी भोजन व प्रसादाची व्यवस्था आहे. येथे भाविकांकडून महागणपतीला सरासरी ६० हजार पूजा व सेवा अर्पण केल्या जाणार आहेत.