Eknath Khadse: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी

हायलाइट्स:

  • माझी भ्रष्टाचारी प्रतिमा करण्याचे काम हितचिंतकाचेच.
  • एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर पुन्हा साधला निशाणा.
  • सुधीर मुनगंटीवार यांनाही खडसे यांनी केले लक्ष्य.

जळगाव: ‘ नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात निर्माण करण्याचे काम चालले आहे. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत, त्यांना आज मी शुभेच्छा देतो. मात्र, मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवशी पुन्हा एकदा विरोधकांना लक्ष्य केले आहे. ( Eknath Khadse Birthday Latest News )

वाचा: अनिल देशमुखांच्या जावयासोबत काय घडलं?; राष्ट्रवादीने विचारला गंभीर सवाल

मुक्ताईनगर येथिल फार्महाऊसवर एकनाथ खडसे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खडसे पुढे म्हणाले की, मुक्ताईनगर मतदारसंघात मी गेल्या ४० वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. हे करत असताना केवळ मुक्ताईनगर नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज मी कोणत्याही पदावर नसलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अलीकडे मी पाहतो आहे. ईडी चौकशी असेल किंवा अन्य प्रकारे माझी जी छळवणूक चाललेली आहे, मला त्रास देण्याचे काम चालू आहे. ते चुकीचे आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये ४० वर्षांत माझ्यावर एकही आक्षेप माझ्यावर नव्हता. असे असताना आता अशा प्रकारे अचानक वादळ उठणे, मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणे, नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे काम चालले आहे. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे. कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही. या सर्व प्रकरणातून मी जनतेच्या आशीर्वादामुळे निश्चितच बाहेर पडेन’, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

वाचा: राज्यात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा; चंद्रकांत पाटलाचा मुख्यमंत्र्यांवर वार

भाजपाचे सरकार असताना मुनगंटीवारांनी कधी खर्च काढला नाही

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीमुळे राज्य सरकारला अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. यावरून खडसे यांनी त्यांनाही टोला लगावला. खडसे म्हणाले की, आपल्या पक्षाचे सरकार असताना सुधीरभाऊंनी कधी खर्चाचा हिशेब काढला नाही. दुसऱ्या पक्षाचे सरकार आले की मात्र लगेच खर्चाचा हिशेब काढायचा. महाराष्ट्राची निर्मिती होऊन जवळपास ६० वर्षे झाली. या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करण्यात आलेलीच आहे. अगदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होते, त्यावेळीही नियुक्ती झालेली आहे. सेना-भाजपचे सरकार होते त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी कधी असा विरोध केला नव्हता. आपले सरकार असताना विरोध करायचा नाही. बाकी दुसऱ्याचं सरकार आले की विरोध करायचा; मुनगंटीवार यांच्याकडून तरी ही अपेक्षा नाही, असा टोला खडसे यांनी लावला.

वाचा:अनिल देशमुखांच्या जावयाला CBIने घेतले ताब्यात; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Source link

Eknath Khadseeknath khadse birthdayeknath khadse birthday latest newseknath khadse latest newseknath khadse on ed probeईडीएकनाथ खडसेभाजपमुक्ताईनगरराष्ट्रवादी
Comments (0)
Add Comment