हायलाइट्स:
- पुण्यात खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा थरार
- चोरट्यानं केला पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार
- हाताचा चावा घेतला तरीही चोर पकडला गेला
पुणे: चोराचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याचा प्रकार पुण्यात घडला. मात्र, गोळीबारानंतरही तरुणाने चोराचा पाठलाग करत त्याला पकडले आहे. भरदिवसा खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला आहे. (Firing in Pune)
अवेज सलीम अन्सारी (वय २३) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी विठ्ठल वामन बोळे (रा. हिंगणे मळा, जळगाव) याला पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वाचा:राज्यात करोना रुग्ण घटत असताना ‘या’ जिल्ह्यानं पुन्हा वाढवली चिंता
जखमी तरुणाचे कुटुंब खडकमाळ येथील राष्ट्रभूषण चौकात एका इमारतीत राहते. दुपारी जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे ते इमारतीच्या टेरेसवर गेले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्याचा फायदा घेऊन आरोपी त्यांच्या घरात शिरला आणि त्याने चोरी केली. त्यानंतर तो खाली जात होता. तेव्हा तरुणाने त्याला पाहिले आणि पायऱ्यांवरून त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्याने तरुणावर दोन गोळ्या झाडल्या. सुदैवानं गोळी लागली नाही. गोळीबाराची पर्वा न करता तरुणानं आरोपीचा पाठलाग केला व आरोपीला पकडले. पकडले गेल्यानंतर आरोपीची व तरुणाची झटापट झाली. यावेळी आरोपी अवेजच्या हाताला चावला. आरोपी सोबत एक महिला होती. ती पळून जाण्यात यशस्वी झाली. या प्रकरणी अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.
वाचा: ‘शिवसेनेचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे, असं कधीच झालेलं नाही’
आरोपी विठ्ठल वामन भोळे हा मूळचा जळगावचा असून सध्या पुण्यातील हडपसर परिसरात रहातो. १९९४ साली खुनाच्या आरोपाखाली त्याला शिक्षा झाली होती.