अटल सेतूसाठी २५० रुपये टोल, शिवडी-न्हावाशेवा प्रवासासाठी १० रुपये वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई : ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’वरून (एमटीएचएल) जाण्यासाठी २५० रुपये टोल भरावा लागणार आहे. ‘हा टोल २४० रुपये असेल’, असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याआधी दिले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हा सेतू उभारणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘जायका’ला दिलेल्या अहवालात किमान दर २४० रुपये दर नमूद केला होता. राज्य मंत्रिमंडळाने त्यात आणखी १० रुपयांची वाढ केली आहे.

‘एमटीएचएल’वर किमान टोल २५० रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. या सेतूवर चारचाकीच्या एकेरी प्रवासासाठी तब्बल २५० रुपये पथकर भरावा लागणार असताना विविध प्रकारचे पास वितरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याअंतर्गत एकाच दिवसात परतीच्या प्रवासासाठी वाहनचालकांना ३७५ रुपये मोजावे लागतील. याशिवाय ६२५ रुपयांत एक दिवसाचा पास व १२ हजार ५०० रुपयांत महिनाभराचा पास घेता येईल.

टोलसाठी ‘एमएमआरडीए’चा प्रस्ताव ५०० रुपये होता व त्याआधारे हा दर निम्मा करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात या सेतूला अर्थसाह्य दिलेल्या ‘जायका’ला दिल्या जात असलेल्या प्रगती अहवालात एमएमआरडीएने किमान टोल २४० रुपये असेल, असे नमूद केले आहे. सर्वांत अलीकडे १८ जुलै, २०२३ रोजी तयार केलेल्या जानेवारी-मार्च, २०२३ या तिमाही अहवालाच्या पान क्रमांक ८सह यासंबंधी आधीच्या व नंतरच्या अन्य तिमाही, सहामाही अहवालातही शिवडी ते चिर्ले या संपूर्ण मार्गासाठी २४० रुपये टोल प्रस्तावित असेल, असे नमूद आहे. या सेतू उभारणीसाठी एकूण २१ हजार २०० कोटी इतका खर्च आला असून, त्यापैकी १५ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

यासंबंधी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे ‘जायका’च्या अहवालात २४० रुपये टोल नमूद केला असताना, दुसरीकडे एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळात हा विषय येण्याआधी या मार्गासाठी सरकारकडे किमान ५०० रुपये दर प्रस्तावित केला होता. तर यासंबंधीच्या अभ्यासगटाने ३५० रुपये किमान दर प्रस्तावित केला होता. मंत्रिमंडळाने तो २५० रुपयांवर निश्चित केला. या टोल दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. दरम्यान यासंबंधी एमएमआरडीएकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

प्रस्तावात २.२४ रुपये प्रति किमीचा उल्लेख

एमएमआरडीएने राज्य सरकारला प्रस्ताव देताना २.२४ रुपये प्रति किमीचा दर निश्चित केला होता. त्यानुसार २२ किमीसाठी ४९.२८ म्हणजेच ५० रुपये टोल असायला हवा. याप्रमाणे अभ्यागटाने १.६० रुपये प्रति किमीचा दर प्रस्तावित केला होता. त्यानुसार टोल ३५ रुपये होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात प्रस्ताव भरमसाठ अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे व त्यानुसार त्यात निम्मी घट केल्याचे सरकारकडून दाखविले जात आहे.

दैनंदिन प्रस्तावित महसूल
(दैनंदिन वाहनांचा सुरुवातीच्या वर्षातील आकडा ‘जायका’ला दिलेल्या प्रगती अहवालानुसार)
वाहनाचा प्रकार दररोज वाहने संभाव्य महसूल (रुपयांत)

चारचाकी २६,८०० ६७ लाख
बस ४९०० १९.६० लाख
बहुचाके ३००० २७.१५ लाख
अवजड वाहने ४६०० ३३.१२ लाख
एकूण वाहने ३९,२०० १ कोटी ४६ लाख ८७ हजार

प्रति किमी तब्बल ११ रु. ३६ पैसे

हा सेतू एकूण २२ किमी लांबीचा आहे. त्यासाठी किमान टोल २५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्रति किमी टोल तब्बल ११ रु. ३६ पैसे होतो. अलीकडे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातील ‘ग्रीनफील्ड’ समृद्धी महामार्गाचा टोल मात्र २.७९ रुपये प्रति किमी आहे, हे विशेष.

Source link

Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhavasheva Atal Setuatal setummrdamthl projectmumbai newsMumbai Trans Harbour Link project
Comments (0)
Add Comment